खोट्या केसमध्ये अडकवून एन्काऊंटरची धमकी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
fake-cbi-officer

सामना प्रतिनिधी । मुंबई

तुमच्या पतपेढीत जो घोटाळा झालेला आहे ते प्रकरण तपासासाठी आमच्याकडे आहे. ते जर वाढवायचे नसेल तर एक कोटी द्यावे लागतील. पैसे दिले नाही तर तुम्हाला एखाद्या मोठय़ा खोटय़ा केसमध्ये अडकवून तुमचे एन्कांऊटर करू, अशा प्रकारे धमकावत संचालकांकडून 50 लाखांची रोकड व एक इनोव्हा कार घेणाऱया दोन तोतया सीबीआय अधिकाऱयांचा खेळ एमएचबी पोलिसांनी खल्लास केला आहे.

राजाभाऊ (नाव बदललेले) हे अंधेरीतील एका पतपेढीचे संचालक असून त्या पतपेढीत घोटाळा झाला होता. याबाबत वृत्तपत्रांमध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. हीच संधी साधत अश्विनी शर्मा आणि साजिद वारेकर या दोघांनी राजाभाऊ यांना तीन महिन्यांपूर्वी भेटून स्वतःची ओळख सीबीआय अधिकारी असल्याचे सांगितले. तुमच्या पतपेढीत घोटाळा झाला आहे. तो मिटविण्यासाठी एक कोटी द्यावे लागतील, असे अश्विनी आणि साजिदने राजाभाऊ यांना सांगितले. जर पैसे दिले नाही तर तुम्हाला खोटय़ा केसमध्ये अडकवून आणि तुमचा एन्काऊंटर करू अशी धमकीदेखील त्यांना दिली. यामुळे घाबरलेल्या राजाभाऊ यांनी दोघा भामटय़ांना 50 लाख रोख व 27 लाखांची इनोव्हा कार दिली. पण इतके घेऊनही आरोपी थांबले नाहीत. त्यांनी पुन्हा राजाभाऊ व त्यांच्या पत्नीला वारंवार फोन करून त्यांची दुसरी इनोव्हा कार देण्याची मागणी सुरू केली. यामुळे आणखीनच घाबरलेल्या राजाभाऊ व त्यांच्या पत्नीने परिमंडळ-11चे उपायुक्त संग्रामसिंग निशाणदार यांना भेटून घडला प्रकार सांगितला. त्यानंतर निशाणदार यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित ठाकरे यांना सांगून आरोपींना तत्काळ पकडण्याची सूचना केली.

इनोव्हा घ्यायला आले आणि लटकले

पंडित ठाकरे व त्यांच्या पथकाने आरोपींना इनोव्हा कार घेण्यासाठी या असे राजाभाऊ यांना बोलण्यास सांगितले आणि त्यांच्या घराभोवती सापळा रचला. इनोव्हा घेण्याच्या लालसेपोटी आरोपी राजाभाऊ यांच्या घराजवळ येताच पोलिसांनी त्यांच्यावर झडप घातली. तेव्हा अश्विनी शर्माविरोधात शहरात अशाप्रकारे फसवणुकीचे पाच गुन्हे, तर साजिदविरोधात एक गुन्हा दाखल आहे.