
मेटा च्या मालकीची अत्यंत लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स फेसबुक (Facebook) आणि इन्स्टाग्राम (Instagram) ची सेवा रविवारी जगभरात अचानक ठप्प झाली. हिंदुस्थानासह जगातील विविध देशांमधील लाखो युजर्सना आपापल्या अकाऊंटमध्ये लॉग-इन करताना आणि प्लॅटफॉर्म वापरताना मोठ्या तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला.
वेबसाईट डाऊन असण्याच्या तक्रारींची नोंद ठेवणाऱ्या डाऊनडिटेक्टर (Downdetector) या प्लॅटफॉर्मनुसार, रविवारी दुपारच्या सुमारास या तांत्रिक बिघाडाच्या तक्रारींमध्ये अचानक मोठी वाढ झाली होती. सुदैवाने, काही तासांच्या कालावधीनंतर ही समस्या हळूहळू पूर्ववत झाली आणि युजर्सना दिलासा मिळाला.
फेसबुकवर लॉग-इन करण्याचा प्रयत्न करताना युजर्सना स्क्रीनवर साईटवर तांत्रिक अडचण असल्याचे सांगणारा मेसेज दिसत होता. यामध्ये खाते तात्पुरते अनुपलब्ध असून ही समस्या लवकरच सोडवली जाईल आणि काही मिनिटांनी पुन्हा प्रयत्न करावा, असा उल्लेख करण्यात आला होता. त्याच वेळी इन्स्टाग्राम वापरकर्त्यांनादेखील आपापली अकाऊंट्स उघडण्यात, स्टोरीज पाहण्यात आणि फीड रिफ्रेश करण्यात अशाच प्रकारच्या अडचणी येत होत्या.
या अचानक उद्भवलेल्या सर्व्हरच्या समस्येबाबत मेटाकंपनीला ईमेलद्वारे विचारणा करण्यात आली होती, मात्र त्यांच्याकडून कोणतेही उत्तर किंवा अधिकृत स्पष्टीकरण मिळालेले नाही.




























































