
दुबईत राहणाऱ्या तरुणीच्या फेसबुक अकाऊंटचा गैरवापर करून सायबर ठगाने तिच्या परिचित मित्रपरिवाराकडून पैसे मागितल्याची घटना समोर आली आहे. तरुणीच्या वडिलांच्या आजारपणाच्या नावाखाली पैसे घेतल्याचे तपासात समोर आले आहे. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हय़ाची नोंद केली.
तक्रारदार यांची मुलगी दुबईत राहत असून तिचे फेसबुकवर अकाऊंट आहे. गेल्या महिन्यात तक्रारदार यांनी त्यांच्या मुलीला फोन केला होता. तेव्हा ती प्रचंड नैराश्यात होती. तिला विश्वासात घेऊन तक्रारदार यांनी विचारपूस केली तेव्हा त्यांच्या मुलीचा अज्ञात व्यक्तीने फेसबुकवरील फोटो चोरून तिच्या नावाने बनावट फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाऊंट तयार केले. ठगाने मुलीच्या वडिलांचे निधन झाले असे सांगून तिच्या मैत्रिणीकडे पैशांची मागणी केली. वारंवार पैशांची मागणी होत असल्याने तरुणीच्या मैत्रिणीला संशय आला. तिने पैसे देण्यास नकार दिला.
गेल्या आठवडय़ात एका तरुणीने तक्रारदार यांच्या मुलीला मेसेज केला. इन्स्टाग्रामवरून तरुणीला अश्लील फोटो पाठवले. वडील आजारी असून त्यांच्या उपचारांसाठी पैशांची गरज असल्याचे सांगून 2 हजार रुपये पाठवण्यास सांगितले. इन्स्टाग्रामवर चॅट करत असताना तरुणीला त्या व्यक्तीचे नाव समजले. त्याचा नंबरही त्या तरुणीला मिळाला. तरुणीने त्याला ते बनावट अकाऊंट डिलीट करण्यास सांगितले. त्याने ते अकाऊंट डिलीट न करता पैसे मागणे सुरूच ठेवले. हा प्रकार लक्षात येताच तक्रारदार यांनी वांद्रे पोलीस ठाण्यात धाव घेतली. वांद्रे पोलिसांनी गुन्हय़ाची नोंद करून तपास सुरू केला आहे.































































