
नवनाथ शिंदे
विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरासह जिल्ह्यात विद्यार्थ्यांकडून शॉर्टकटचा वापर केला जात आहे. विशेषत: परीक्षेला डमी विद्यार्थी बसविणे, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसद्वारे लेखी परीक्षा पास होण्याचा अवलंब करणे, थेट विद्यापीठाच्या नावाने डिग्री विकत घेणे, अशा घटना वाढल्या आहेत.
पोलीस भरतीची लेखी परीक्षा, लोहमार्ग पोलीस भरतीची परीक्षा आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नावाने थेट डिग्री विकण्याचा प्रकारही उजेडात आला आहे. पुणे पोलीस आयुक्तालयांतर्गत 5 सप्टेंबरला घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेला बसविले गेल्याचे उघडकीस आले आहे.
पुण्यात पोलीस भरतीसह लोहमार्ग पोलीस भरतीसाठी परीक्षा घेण्यात आली. परीक्षेदरम्यान संबंधित संशयित विद्यार्थ्यांची हालचाल जाणवल्यामुळे पुणे पोलिसांनी कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांसह त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या पाच जणांना अटक केली. पुणे पोलीस आयुक्तालयांतर्गत पोलीस शिपाईपदाच्या रिक्त जागांसाठी 5 ऑक्टोबरला लेखी परीक्षा घेण्यात आली होती. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परीक्षा केंद्रावर डमी उमेदवारासह त्याला प्रोत्साहन देणार आणि मूळ उमेदवाराला अटक करण्यात आली. त्याशिवाय सिंहगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील केंद्रावर डमी उमेदवार याच्यासह मूळ उमेदवारालाही पोलिसांनी अटक केली.
लोहमार्ग पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत चक्क इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसद्वारे टेक्नोसॅव्ही कॉपी करणाऱ्या मुन्नाभाईला स्वारगेट पोलिसांनी अटक केली. गुलटेकडीतील परीक्षा केंद्रावर घटना उघडकीस आली. जीवन फंडुसिंग गुनसिंगे (25, रा. संजरपूरवाडी, वैजापूर, संभाजीनगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. लोहमार्ग पोलीस भरतीची लेखी परीक्षा होती. गुलटेकडीतील परीक्षा केंद्रावर परीक्षेचा पेपर सोडवित असताना गुनसिंगे याने इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसच्या मदतीने कॉपी केली होती.
बनावट डिग्री विकणाऱ्या टोळीचा पर्दापाश
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह इतर महाविद्यालयांच्या नावाने बनावट पदव्या बनवून विक्री करणाऱ्या नीरेतील टोळीचा ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने काही दिवसांपूर्वी पर्दापाश केला आहे. टोळीकडून संबंधित बनावट प्रमाणपत्रे कोणालाही ओळखू येऊ नये, यासाठी टोळीने हुबेहूब मॅफलियो कागदाचा वापर केल्याचे तपासात उघड झाले आहे. ग्रामीण भागातील गरजू तरुणांना बनावट कागदपत्रे देण्यासाठी टोळीकडून 5 ते 50 हजारांपर्यंत रक्कम घेतली जात होती. त्यासाठी आरोपी नापास झालेल्यांची कागदपत्रे ताब्यात घेत होते. त्यावरील मूळ विद्यापीठाचा लोगो पाण्याने काढून टाकल्यानंतर त्यावर संबंधित लोगो बनावट कागदपत्रांवर चिकटवत होते.
इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसद्वारे अशी केली जातेय कॉपी
अतिशय छोट्या असलेल्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसमध्ये कानातील (इअर) फोनद्वारे ऐकण्याची सोय केली जाते. त्यानुसार उमेदमाने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे बाहेरील मदतनिसांकडून सांगितली जातात. कानात असलेल्या छोट्या इअर फोनच्या मदतीने उत्तरे ऐकून लिहिण्याची क्लुप्ती केली जात असल्याचे दिसून आले आहे. पोलीसभरतीच्या लेखी परीक्षेत पास होण्यासाठी उमेदवारांच्या टेक्नोसॅव्हीचे पेव वाढत चालले आहे. त्यामुळे अशा घटनांमुळे सातत्याने चिकाटीने अभ्यास करणाऱ्या उमेदवारांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
























































