
सामना ऑनलाईन । नागपूर
संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या संभाजी भिडे यांच्या वक्तव्याची चौकशी केली जाईल असं निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केलं. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.
शनिवारी संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या पालखी सोहळ्याचं पुण्यात स्वागत करण्यात आलं. श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी या पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते. या सोहळ्यानंतर मंदिरात सर्व धारकऱ्यांना भिडे गुरुजींनी मार्गदर्शनही केले. या भाषणात त्यांनी मनु हा संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराज यांच्यापेक्षा श्रेष्ठ होता असं विधान केल्याचे आरोप त्यांच्यावर करण्यात आले होते. या मुद्द्यावरून विरोधकांनी विधानासभेच्या पावसाळी अधिवेशनात मुख्यंमत्र्यांना प्रश्न विचारला होता.
विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, संभाजी भिडे गुरुजींनी नेमकं काय विधान केलं, याची तपासणी करण्यात येईल. तसंच जर या तपासणीअंती काही आक्षेपार्ह आढळल्यास कारवाईही करण्यात येईल असं निवेदन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे.
























































