
सामना प्रतिनिधी। फैजपूर
हॅकर हे खोटारडे असतात, त्यांच्यावर विश्वास ठेवू नये असे पक्षाने सांगितले. मात्र माझ्या बाबतीतही हॅकर मनीष भंगाळेने माझे दाऊदसोबत संभाषण असल्याचे सांगितले होते व त्याच्या बोलण्यावर त्यावेळी विश्वास कसा ठेवण्यात आला असा प्रश्न भाजपाचे आमदार एकनाथ खडसे यांनी केला.
फैजपूर येथे पत्रकार संघाच्या वातानुकूलित पत्रकार परीषद हॉलच्या उद्घाटनप्रसंगी आमदार खडसे बोलत होते. आमदार खडसे म्हणाले की, हॅकर मनीष भंगाळेन माझ्यावर जे आरोप केले हे कसे खरे मानण्यात आले. त्यानंतर झालेल्या मीडिया ट्रायलमुळे मला माझ्या पदाचा राजीनामा द्यावा लागला व मीडिया ट्रायलमुळे एखाद्याचे आयुष्य उध्वस्त होऊ शकते, अशी खंतदेखील त्यांनी व्यक्त केली. वेगवेगळ्या आरोपांमूळे सुमारे दोन वर्षांपासून मंत्री मंडळाबाहेर असलेले आमदार खडसे पक्षावर कमालीचे नाराज आहेत. विविध आरोपातून त्यांना क्लिनचीट मिळाल्यानंतर पक्ष दखल घेत नसल्याचे शल्य आहे. त्यामुळे अधून-मधून ते पक्षावर टिकेची तोफ डागत आहेत. त्यातच भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांची हत्या ईव्हीएम मशीनच्या माहितीमुळे झाली असल्याचा दावा अमेरीकेतील हॅकर सय्यद शुजा याने केल्यानंतर हिंदुस्थानात खळबळ उडाली होती. त्यानंतर पक्षाने हॅकर हे खोटारडे असल्याने त्यांच्यावर विश्वास ठेवू नये, अशी भूमिका भाजपाने मांडली होती. या भूमिकेचा आधार घेत खडसे यांनी फैजपूर येथे पुन्हा पक्षाला लक्ष्य करीत हॅकर जर खोटारडे असतात तर मग माझ्या बाबतीतही हॅकर मनीष भंगाळे याने माझ्यावर दाऊद सोबत संभाषणाचा दावा केला होता मग त्याच्यावर का विश्वास ठेवण्यात आला असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
आमदार एकनाथ खडसे व अंडरवल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांच्यात दूरध्वनीद्वारे संभाषण झाल्याचा व त्याचे कॉल डिटेल्स आपल्याकडे असल्याचा दावा हॅकर मनीष भंगाळेने केला होता. त्यानंतर मुंबई पोलिसांनी तपासाअंती खडसे यांना क्लिन चीट दिली होती.
































































