वाहतूक पोलिसांच्या नावाने बनावट परिपत्रक व्हायरल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुरुवारी मुंबईत व्हीव्हीआयपी व्यक्ती येणार असल्याने शहरातील काही मार्ग वाहतुकीसाठी बंद राहतील. तेव्हा नागरिकांनी याची दखल घेऊन त्या मार्गांवर जायचे टाळावे, असे आवाहन करणारे वाहतुक पोलिसांच्या नावाने एक परिपत्रक आज समाज माध्यामातून व्हायरल झाले. हा प्रकार कळताच वाहतुक पोलिसांनी त्यावर खुलासा करत कोणीतरी हा खोडसाळपणा केला असून असे कोणतेही पत्रक आम्ही प्रसिद्ध केले नसल्याचे स्पष्ट केले आहे.

अतिमहत्वाच्या व्यक्ती गुरूवारी सकाळी मुंबईत येणार आहेत. त्यामुळे शहरातील हाजीअली, वरळी सागरी सेतु, गिरगाव, पेडल रोड, वांद्रे असे मार्ग वाहतुकीसाठी काही वेळेसाठी बंद राहतील, असे पत्रक वाहतुक पोलिसांच्या नावाने समाज माध्यमावर व्हायरल झाले होते. हे पत्रक पोलिसांच्या नजरेस पडल्यानंतर मुंबई पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली. सदर पत्रक हे बनावट असून असे कोणतेही पत्रक आम्ही प्रसिद्ध केलेले नाही. तसेच हा खोडसाळपणा केलाय त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.