फलकाबाबत कारवाईची धमकी देऊन डॉक्टर्स, दुकानमालकांकडून ऑनलाईन पैसे उकळले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रुग्णालये, दुकानांबाहेरील फलकांवर असलेल्या संपर्क क्रमांकावर कॉल करून संबंधितांना स्वतःची पालिका अधिकारी म्हणून ओळख सांगायची. तुम्ही विनापरवाना लावलेल्या फलकांवर कारवाई करणार असा दम भरत कारवाई होऊ द्यायची नसल्यास सेटलमेंट करा, असा पर्याय देऊन डॉक्टर्स तसेच दुकानमालकांकडून ऑनलाईन पैसे उकळणाऱ्या तिघांचा गुन्हे शाखा युनिट-9 ने खेळ खल्लास केला आहे.

काही भामटे स्वतःची पालिका अधिकारी अशी ओळख सांगून रुग्णालयाबाहेर लावलेले फलक बेकायदेशीर आहेत, तुमच्यावर कारवाई करणार असे धमकावून पैसे उकळत असल्याची तक्रार शहरातील काही नामांकित डॉक्टरांनी खार व वांद्रे पोलीस ठाण्यात दाखल केली होती. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर गुह्याची गंभीरता लक्षात घेऊन गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला. युनिट-9 चे वरिष्ठ निरीक्षक दया नायक यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक किरण आहेर, सहाय्यक पोलीस निरीक्षक उत्कर्ष वझे, महेंद्र पाटील, उपनिरीक्षक स्नेहल पाटील तसेच दत्तात्रय कोळी, महेश मोहिते, प्रशांत भूमकर, शार्दुल बनसोडे, साधना सावंत या पथकाने डॉक्टर व दुकानमालकांना धमकावत त्यांना आर्थिक चुना लावणाऱया भामटय़ांचा शोध सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक बाबींच्या आधारे शोध घेत असताना आरोपी हे अंधेरी, वर्सोवा परिसरात राहणारे असल्याचे निष्पन्न झाले. मग खबऱ्यांच्या मदतीने दया नायक व पथकाने विवेक सदरे (30), अविनाश अरोरा (30) आणि राहुल जठार (32) अशा तिघा भामटय़ांच्या मुसक्या आवळल्या. विकास हा ज्युनिअर आर्टिस्ट, अविनाश हा ओला चालक तर राहुल हाऊस किपिंगचे काम करतो. त्यांचा चौथा साथीदार निरजकुमार सहा हा अद्याप हाती आला नसून त्याचा शोध सुरू आहे. तोही ऑक्टिंगचे काम करतो. अटक आरोपींनी शहरातील विविध डॉक्टर्स व दुकानमालकांना अशा प्रकारे कारवाईची धमकी देऊन आर्थिक चुना लावला असल्याचे समोर आले आहे. शिवाय या आरोपींविरोधात विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत.