रिक्षातून पडून 11 वर्षांच्या दर्शनचा मृत्यू: ग्रामस्थांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या

25

सामना प्रतिनिधी । धुळे

शिंदखेडा तालुक्यातील साहूर येथून दोंडाईचा येथील शाळेत जाताना रिक्षातून पडून अकरा वर्षांचा दर्शन मनोज कोळी या विद्यार्थ्याचा गुरुवारी सकाळी मृत्यू झाला. त्यानंतर संतप्त नातेवाईक आणि पंचायत समिती सदस्य शहाणा सोनवणे यांनी दर्शनचा मृतदेह थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर आणला. जिल्हाधिकारी, परिवहन महामंडळाच्या विभाग नियंत्रक आणि लोकप्रतिनिधींवर खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. यावेळी दर्शनच्या आईने टाहो फोडला. तेव्हा उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांची मनं हेलावली.

तापी काठावरील साहुल, झोतवाडे, शेंदवाडे, दाउळ, मंदाणे या गावांतील विद्यार्थ्यांसाठी बस उपलब्ध करून द्यावी यासाठी वर्षभर आंदोलने झाली. आंदोलकांना आश्वासने देण्यात आली, पण पूर्तता झाली नाही. जिल्हाधिकारी कार्यालयावर शहाणा सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना घेऊन मोर्चा काढला होता. त्यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आश्वासनाची पूर्तता होईल, यापुढे विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयावर आणल्यास गुन्हा दाखल करेल, असा सज्जड दम दिला होता. या पार्श्वभूमीवर गुरुवारी साहूर येथे दर्शन कोळी याचा बळी गेला आहे. सकाळी साडेदहाच्या सुमारास 30 विद्यार्थी रिक्षात कोंबून रिक्षा दोंडाईचाकडे निघाली. पण रस्त्यावरील खड्डे चुकविताना रिक्षाने हेलकावे घेतले. त्यात रिक्षातील दर्शन कोळी खाली कोसळला आणि रिक्षाच्या चाकाखाली आला. त्यातच त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर ग्रामस्थ तसेच नातेवाईक संतप्त झाले. त्यांनी दर्शनचा मृतदेह घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर जाण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, जिल्हाधिकारी रेखावार कार्यालयातून गायब झाले. या परिस्थितीत आता जिल्हाधिकारी रेखावार पापक्षालन करण्यासाठी काय शिक्षा घेणार? असा प्रश्न आंदोलन करणाऱ्या शिवसेना उपजिल्हाप्रमुख शहाना सोनवणे यांनी उपस्थित केला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात दर्शनचा मृतदेह आणल्यानंतर त्याच्या आईने टाहो फोडला. शाळेत जाण्याचा हट्ट केला नसता तर आज दर्शन जिवंत राहिला असता, असे म्हणत तिने शिक्षण व्यवस्थेवर गंभीर दोषारोप केले. यानंतर योग्य ती कारवाई करू असे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर दर्शनचा मृतदेह विच्छेदनासाठी भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयाकडे सोपविण्यात आला.

वारंवार मागणी करूनदेखील साहूर, झोतवाडे, दाउळ, मंदाणे, शेंदवडे या गावांसाठी बस देण्यात आली नाही. हेतुतः टाळाटाळ करण्यात आली आहे. हे सारे कुठल्या तरी अज्ञात राजकीय शक्तीच्या इशाऱ्याने होत आहे. दर्शन कोळी याचा झालेला मृत्यू हा आता या सर्व अधिकाऱ्यांना शाप ठरेल. याप्रकरणी जिल्हाधिकारी रेखावार, तहसीलदार महाजन, महामंडळाच्या विभाग नियंत्रक मनीषा सपकाळे आणि लोकप्रतिनिधी यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आहे.

दर्शन कोळी यांच्या कुटुंबीयांना शासनाने 25 लाखांची मदत करावी. आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आंदोलनाची तीव्रता वाढेल. – शहाणा सोनावणे (पंचायत समिती सदस्य, शिवसेना उपजिल्हाप्रमुख)

आपली प्रतिक्रिया द्या