बुरारी प्रकरण, मुलानेच लटकवलं संपूर्ण कुटुंबाला फासावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या नवी दिल्लीतील बुरारी मृत्यूकांडप्रकरणी रोज नवीन खुलासे होत असतानाच पोलिसांनी मंगळवारी अजून एक खळबळजनक दावा केला आहे. 11 जणांच्या या मृत्यूमागे कुठल्याही तांत्रिकाचा हात नसून कुटुंबातील ललित या मुलानेच हे मृत्यूकांड घ़डवल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. घरात सापडलेल्या एका रजिस्टारमध्ये या मूत्यूकांडांशी संबंधित माहिती पोलिसांच्या हाती लागल्याच सांगण्यात येत आहे.

रविवारी दिल्लीतील बुरारी भागात राहणाऱ्या भाटीया कुटुंबातील 11 जणांचे मृतदेह घरात लटकलेल्या अवस्थेत आढळले होते. तपासादरम्यान यामागे एखाद्या जादू टोणा करणाऱ्या तांत्रिकाचा हात असावा असे पोलिसांना वाटले होते. घरात एक डायरी पोलिसांच्या हाती लागली होती. त्यात 2015 पासूनच्या गूढविद्येशी संबंधित नोंदी करण्यात आल्याचे पोलिसांना आढळले. यातील सर्व नोंदी भाटीया कुटुंबातील ललित या मुलाने लिहल्याचे स्पष्ट झाले होते. ललितला मानसिक आजार जडला होता. आपल्याशी मृत वडील बोलतात असा त्याचा दावा होता. घरातल्यांचाही त्याच्यावर विश्वास होता. त्यामुळे त्याच्या प्रत्येक गोष्टींवर ते विश्वास ठेवायचे व तो सांगेल तसेच वागायचे.

त्याला परमेश्वराने वेगळी शक्ती दिली आहे ज्यामुळे तो मृत व्यक्तीशी संवाद साधू शकतो असा कुटुंबाचा समज होता. ललितच्या सांगण्यावर विश्वास ठेवून मोक्ष प्राप्तीसाठी आयुष्य संपवण्याची तयारीही कुटुंबाने केली होती. त्याची रंगीत तालीम त्यांनी केली होती. ज्याप्रमाणे वडाच्या पारंब्या लटकतात त्याप्रमाणे गळफास लावून आत्महत्या करण्यासही सगळ भाटीया कुटुंब तयार होत.

यातूनच गळफास घेण्याआधी भीती वाटू नये म्हणून सगळ्यांनी डोळ्यावर व तोंडावर पट्टी बांधली. यासाठी ललित आणि त्याची पत्नी टीना यांनीच कुटुंबातील इतरांना मदत केली. त्यानंतर ललित व टीनाने स्वत;ला संपवले असावे असे पोलिसांचे म्हणणे आहे. तर भाटीया कुटुंबीयांच्या नातेवाईकांनी पोलिसांचे दावे फेटाळले आहेत.