
हमास विरुद्ध इस्रायलने छेडलेलं युद्ध सहाव्या दिवशीही सुरू आहे. या कठीण प्रसंगात इस्रायलचे नागरिकच त्याची ढाल म्हणून दहशतवाद्यांसमोर उभे ठाकले आहेत. इस्रायलमधला प्रत्येक नागरिक, मग तो नेता असो वा अभिनेता, देशसेवा करण्यासाठी ते सैन्यात सामील झाले आहेत. त्याखेरीज जगभरातील विविध देशांमध्ये गेलेले इस्रायली नागरिकही याच युद्धासाठी देशात परतले आहेत. जे वाहन मिळेल त्यातून त्यांनी मायभूमीचा रस्ता धरला आहे. इतकंच नव्हे तर अगदी वयाची 90 वर्षं पार केलेले नागरिकही युद्धात सहभागी होत आहेत.
7 ऑक्टोबर रोजी हमासने इस्रायलवर हल्ला केला. पाच हजारांहून अधिक क्षेपणास्त्रांचा मारा करत अनेक दहशतवादी इस्रायलच्या सीमाभागातून देशात घुसले. अनेक निरपराध नागरिकांची हत्या करून त्यांनी कैक नागरिकांचं अपहरण केलं. हमासच्या या निर्घृण हल्ल्याने संतापलेल्या इस्रायलने युद्धाची घोषणा केली आणि गाझापट्टीवर हल्लाबोल केला. या युद्धात सैन्यात सहभागी होऊन देशाचं संरक्षण करण्यासाठी आता तिथला प्रत्येक नागरिक सज्ज झाला आहे.
या युद्धासाठी विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. मुख्य म्हणजे त्यात सत्ताधारी पक्षासह विरोधी पक्षही सहभागी झाला असून ही समिती युद्धाचं पुढचं धोरण आखणार आहे. त्यातील काही धोरणानुसार, आतापर्यंत तीन लाखहून अधिक राखीव सैनिकांनी सैन्यात सहभाग घेतला आहे. त्यात विरोधी पक्षाचे नेते नफ्ताली बेनेट यांचंही नाव आहे. बेनेट यांच्याखेरीज नतालिया फादेव ही मॉडेलही सैन्यात सामील झाी आहे. आमच्यासाठी प्रार्थना करा, असं आवाहन तिने जगभरातील तिच्या चाहत्यांना केलं आहे. विशेष म्हणजे सैन्यात सहभागी होण्यासाठी कोणतंही बंधन किंवा किंतु परंतु न बाळगता अगदी वयाची नव्वदी पार केलेले नागरिकही सैन्यात सहभागी होत आहेत.
























































