हिरवंगार फणसाड

अनंत सोनवणे, sonawane.anant@gmail.com

निसर्गानं आधीच कोकण प्रदेशाला भरभरून सौंदर्य बहाल केलंय… फणसाडचं अत्यंत घनदाट जंगल म्हणजे तर कोकणच्या निसर्ग संपन्नतेचा मुकुटमणीच…

बऱ्याच वर्षांपूर्वी काही कामानिमित्त पत्नीसह रायगड जिह्यातल्या नांदगावला गेलो होतो. वेळात वेळ काढून फणसाड वन्य जीव अभयारण्याला धावती का होईना पण भेट द्यायचीच असं ठरवून गेलो होतो. नांदगावचं काम आटोपून फणसाडला पोहचेपर्यंत धो धो पाऊस सुरू झाला होता. भरपावसात जंगलात शिरलो. संपूर्ण जंगलात आम्ही दोघेच आणि आमचा वाटाडय़ा. जंगलभर पसरलेल्या रानवाटांना छोटय़ा ओहोळांचं रूप आलेलं. त्या थंडगार पाण्यातून चालताना मध्येच बेडूक उडय़ा मारत जायचे, तर कधी विविध रंगांचे खेकडे पळताना दिसायचे. अशा झोडपावसात पक्षी किंवा वन्य जीव दिसणं कठीणच होतं. पण पावसाच्या धारा आणि बोचरा वारा अंगावर घेत त्या हिरव्याकंच जंगलातून नुसतं भटकणं हाच एक अविस्मरणीय अनुभव होता. त्यातूनही निरीक्षण मनोऱ्यावरून पाहिलेल्या निसर्गसौंदर्याने तर आमचा अवघा जन्म सार्थकी लागला. नजर जाईल तिथवर फक्त गर्द हिरवाई, तिला न्हाऊ घालणारा मुसळधार पाऊस आणि पावसाच्या धारांना आपल्या लहरीनुसार दिशा देणारा धसमुसळा वारा.

फणसाड अभयारण्याशी झालेली ही पहिली ओळख. निसर्गानं आधीच कोकण प्रदेशाला भरभरून सौंदर्य बहाल केलंय. फणसाडचं अत्यंत घनदाट जंगल म्हणजे तर कोकणच्या निसर्गसंपन्नतेचा मुकुटमणीच. खूप पूर्वीपासून या जंगलाचं योग्य संरक्षण झालंय. पूर्वी हे जंगल जंजिरा राज्याच्या नवाबाचं खासगी शिकार क्षेत्र होतं. साहजिकच इतर कुणालाही इथं शिकार किंवा लाकूडतोड करता येत नव्हती. नवाबानेच फणसाडच्या जंगलात वन्य जिवांसाठी पाणवठे बांधले, रस्ते तयार केले. जंगलातली गावं, वस्त्या बाहेर हलवल्या. पुढे १९८६ मध्ये या जंगलाला अभयारण्याचा दर्जा मिळाला. प्रदीर्घ काळ मिळालेल्या संरक्षणामुळे फणसाडच्या जंगलात वनस्पती, वृक्ष, वन्य जीव, पक्षी यांच्या संख्येत लक्षणीय वाढ दिसते.

हे जंगल सदा हरितपर्णी प्रकारात मोडतं. जंगल अतिशय घनदाट असलं तरी वनविभागानं अनेक पायवाटा तयार केल्या आहेत. या पायवाटांवरून भटकत निसर्गाचा मनसोक्त आस्वाद घेता येतो. फणसाडच्या जंगलात प्रामुख्यानं जांभूळ, आंबा, औदुंबर, पिंपळ, अर्जुन, बहावा, पळस, पांगारा, सावरी, साग, बेहडा, हिरडा हे वृक्ष तसेच बांबूची बेटं आढळतात. फणसाड अभयारण्यात सर्पगरुड, काळा गरुड, व्याध, शिक्रा, स्वर्गनांचण, हिरव्या चोचीचा मल्कोहा, मत्स्यघुबड, पट्टेरी पिंगळा, रातवा, खंडय़ा, नवरंग, मलबार व मोठा धनेश, टकाचोर, पावशा, करकोचे, रानबदकं, तितर इत्यादी पक्षी पाहायला मिळतात. त्याशिवाय इथं शंभरहून अधिक प्रजातींची फुलपाखरंही आढळतात.

पक्ष्यांबरोबरच फणसाडचं जंगल प्रसिद्ध आहे ते सरपटणाऱ्या प्राण्यांसाठी. विषारी सापांमध्ये इथं मलबार पीट वायपर, बांबू पीट वायपर, नाग, फुरसं, मण्यार, घोणस हे प्रकार आढळतात. तसंच धामण, अजगर, विरोळा, तांबडय़ा पाठीचा झाडसाप, हरणटोळे हे बिनविषारी सापही इथं दिसतात. याशिवाय घोरपड, रानसरडे, सापसुरळी इत्यादी सरपटणारे जीवही या जंगलात पाहायला मिळतात.

इथं बिबळय़ाचं वास्तव्य आहे. तसंच रानमांजर, ताडमांजर, मुंगूस, शेकरू, तरस, सांबर, माकड, रानडुक्कर, वटवाघूळ इत्यादी वन्य जीव इथं दिसू शकतात. एका नवाबानं स्वतःच्या शौकच्या निमित्तानं का होईना पण हा निसर्गदेवताचा ठेवा जतन केला. त्यामुळे आज तो आपल्यापर्यंत पोहचला. पुढच्या पिढय़ांनाही त्याचा आस्वाद घेता यावा यासाठी हा ठेवा जपून ठेवणं ही आपली जबाबदारी आहे.

फणसाड वन्यजीव अभयारण्य

प्रमुख आकर्षण…भरपूर पक्षी,

सरपटणारे प्राणी

जिल्हा…रायगड

राज्य…महाराष्ट्र

क्षेत्रफळ…६९.७९ चौ.कि.मी.

निर्मिती…१९८६

जवळचे रेल्वे स्थानक…रोहा (३० कि.मी.)

जवळचे विमानतळ…मुंबई (१४० कि.मी.)

निवासव्यवस्था…जंजिरा, अलिबाग येथे अनेक खासगी हॉटेल्स व रिसॉर्टस् सर्वाधिक

योग्य हंगाम…ऑगस्ट ते फेब्रुवारी

सुट्टीचा काळ…नाही

साप्ताहिक सुट्टीचा दिवस…नाही