कोरोनाः काही शंका, प्रश्न आणि उत्तरे

>> प्रा. डॉ. गजानन  एकबोटे  

कोरोना आजाराबाबत गंभीर होणे गरजेचे आहे. सतत मास्क लावा. 30 सेकंद हात धुवा. एकटय़ाने दिनक्रम पार पाडण्याची सवय लावून घ्यावी. स्वतःची कामे स्वतःच करण्याची सवय लावा. ही शिस्त पाळली तरच कोरोनातून बचाव होऊ शकतो. कोरोनाबाबत सामान्य लोकांच्या मनात अनेक शंका, प्रश्न आहेत. त्यातील काही नेहमीच विचारले जाणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरे…

कोरोना विषाणू हवेतूनच पसरतो असे सांगतात

– होय, हा विषाणू हवेतूनही पसरतो, असे जागतिक आरोग्य संस्थेने जाहीर केले आहे. पण हा हवेतून कसा पसरतो हे लक्षात घ्या. एका खोलीत दोन व्यक्ती बसल्या असतील आणि त्यातील एकाला कोरोना झाला असेल तर त्या व्यक्तीच्या श्वासातून हा कोरोना हवेत जातो. पण हा विषाणू जड असल्याने तो चार-पाच मिनिटेच हवेत राहतो. या चार-पाच मिनिटांत त्या विषाणूचा दुसऱया व्यक्तीशी संपर्क आला तर तो त्याच्या शरीरात शिरू शकतो. यासाठीच मास्क घालणे गरजेचे आहे. हा हवेत जास्तीत जास्त 4 मिनिटे राहत असल्याने खुल्या ठिकाणी हा धोका फार नसतो.

हा विषाणू 14 दिवसांत मरतो का?

– कोरोनाची लागण झाली तर तो 14 दिवसांत बरा होतो. तसेच दहा दिवसानंतर लक्षणे नसतील तर अशा रुग्णांपासून इतरांना संसर्ग फार कमी प्रमाणात होतो. आजार बरा झाला तरी सुमारे 30 दिवस अशक्तपणा राहतो. त्यासाठी व्यायाम, योग व फिजिओथेरपी आवश्यक आहे.

आता नोकरीवर जावे लागते, त्यामुळे बाहेर पडावेच लागते…

– होय, आवश्यक आहे तिथे बाहेर जावे लागते. परंतु तेव्हा आपण काळजी घ्यायला हवी. बसने जात असाल तर एका सीटवर एकच जण बसा, बस भरलेली असेल तर त्यात चढू नका. दुसऱया बसची वाट बघा. ट्रेनने जात असाल तर एका सीटवर दोघेच बसा. जागा नसेल तर उभे राहून प्रवास करा. सतत मास्क लावा. काहीजण नाक उघडे ठेवतात. हे योग्य नाही. काही गळय़ात मास्क अडकवला तर त्या मास्कच्या आतील बाजूला विषाणू येऊ शकतो. मग तुम्ही तो मास्क तोंडावर लावता तेंव्हा मास्कवरील विषाणू थेट तोंडातून आत जातो.

आणखी कोणती काळजी घ्यायची?

– ऑफिसमध्ये एकापेक्षा जास्त व्यक्ती असतील तर पूर्णवेळ मास्क लावून बसा. आपल्या सहकाऱयांबरोबर एकत्र जेवायचे नाही की चहा प्यायचा नाही. आपली तशी संस्कृती नाही, पण यातून बचाव करायचा असेल तर एकटेपणाने दिनचर्या करण्याची सवय लावून घ्यावी लागेल. सकाळी व्यायामाला जाताना, बाजारात जाताना अंतर ठेवायचेच. अगदी कुटुंबातील कुणी असले तरी बाहेर गेल्यावर अंतर ठेवून चाला. घरी आल्यावर कपडे साबणाच्या पाण्यात भिजवून ठेवायचे. आपल्या शरीराचा जो भाग कपडय़ाने झाकलेला नसतो त्या भागावर साबण लावून 30 सेकंदांपर्यंत ठेवावे. त्यानंतरच ते पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावे. आपल्याला साबण लावला की पाण्यानी धुण्याची सवय असते, ती बदलावी लागेल. गरम पाणी प्यायचे, मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करायच्या, कच्चे काहीही अजिबात खायचे नाही. फ्रीजमधील पदार्थ बाहेर काढून त्याचे तापमान सामान्य झाल्यावरच तो पदार्थ खायचा. हळद, सुंठ घालून गरम दूध प्यायचे.

खासगी आणि सरकारी चाचणीत एकाच व्यक्तीचे दोन वेगळे अहवाल येतात ते कसे?

– खासगी आणि सरकारी चाचणीसाठी एकच Swab दिला तर अहवाल वेगळे येणार नाहीत, परंतु वेगळे Swab दिले अहवाल वेगळे येऊ शकतात. कारण दोन चाचण्यांमध्ये वेळेचे अंतर असते. शिवाय Swab घशातून घेतला आणि नाकातून घेतला तरी फरक पडतो.

एकदा कोरोना झाल्यानंतर त्या व्यक्तीला पुन्हा कोरोना होण्याची शक्यता असते का?

– एकदा कोरोना होऊन गेल्यावर त्या व्यक्तीमध्ये निर्माण झालेल्या Antibodies (प्रतिकारशक्ती) तीन महिने राहतात. त्यामुळे एकदा कोरोना होऊन गेल्यावर त्या व्यक्तीस पुढील तीन महिने कोरोना होण्याची शक्यता कमी असते. परंतु असे असले तरी एकदा कोरोना झाल्यावरही परत कोरोना होऊ नये म्हणून SMS चे पालन करणे अतिशय आवश्यक आहे (S- Social (Physical) distancing, M- Wearing Mask, S – Use of Soap & Sanitizer). कोरोना ज्यांना उच्च रक्तदाब, कर्करोग, मधुमेह, दमा इ. विकार आहेत त्यांनी जास्त काळजी घेणे आवश्यक आहे.

एखादा कोरोनातून बरा झाला असेल तर त्याला परत कोरोना होऊ शकतो का?

– कोरोनातून बरा झालेल्या रुग्णात जर Antibodies तयार झाल्या असतील तर त्याला पुन्हा कोरोना लवकर होत नाही. पण त्याला सौम्य आजार असेल आणि Antibodies निर्माण होण्यापूर्वी विषाणू गेला असेल तर त्याला पुन्हा कोरोना होण्याची शक्यता असेल. यासाठी या आजारातून बरे झालेले असतात त्यांनीही इतरांप्रमाणे मास्क लावणे, गरम पाणी पिणे ही सर्व काळजी घेत राहायची आहे.

कोरोनाशी लढा देऊन पूर्ण बरे झाल्यावरही अनेकांना खूप थकवा जाणवतो

– कोरोनातून बरा झालेल्या रुग्णाला पुढे चार आठवडे थकवा जाणवू शकतो. याचे कारण हा विषाणू फुप्फुसावर हल्ला करतो. त्यामुळे फुप्फुसाची क्रिया कमकुवत होते आणि हवेतून ऑक्सिजन घेऊन ते शरीरभर पोचविण्याचे त्याचे कार्य कमी होते. फुप्फुस पूर्ण बरे होण्यास चार आठवडे लागतात. म्हणून तितका काळ थकवा जाणवू शकतो. या काळात फिजिओथेरपी व्यायाम करणे महत्त्वाचे आहे.

कोरोना आजारातून बऱया झालेल्या रुग्णाला प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन केले जात आहे

– कोरोनाशी लढा देताना रुग्णाच्या शरीरात प्रतिकार करणाऱया ऍंटीबॉडीज तयार होतात. हा रुग्ण बरा झाल्यावरही त्याच्या रक्तातील प्लाझ्मात या ऍंटीबॉडीज राहतात. त्याने जर प्लाझ्मा दान केले तर दुसऱया रुग्णाच्या रक्तात या ऍंटीबॉडीज जातात आणि त्या तेथील कोरोना विषाणूशी लढतात. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही याकडे विशेष लक्ष देऊन प्लाझ्मा दानाचे आवाहन केले आहे.

संभाजीनगरला रॅपिड अँटिजेन चाचणी करून कोरोना आहे की नाही याचे 30 मिनिटांत निदान मिळत आहे. इतर या चाचण्या का करीत नाहीत?

– रॅपिड अँटिजेन चाचण्यांचे जे किट सुरुवातीला चीनहून आले ते अयोग्य ठरल्याने परत पाठवले. आता नवे किट आले आहे. त्यामुळे अधिक चाचण्या सुरू होतील. या चाचणीत एखादा रुग्ण पॉझिटिव्ह असला तर रुग्णाला लागण झालेलीच असते. परंतु निगेटिव्ह आला तरी लागण झालेली नाही असे म्हणता येणार नाही. कारण शरीरात विषाणू कमी असतील तर या चाचणीत त्याचे अस्तित्व पकडले जात नाही.

चाळ/वाडा अथवा वस्तीतील एखाद्या कुटुंबाला कोरोनाची लागण झाल्यास कोणती काळजी घ्यावी?

– चाळीतील/वाडय़ातील/वस्तीतील सर्वांनी त्या कुटुंबाला मदत करावी. सदर कुटुंबाचे विलगीकरण करावे. त्याचप्रमाणे तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यायला सांगावा.त्यांच्या वापरात असलेले बाथरूम, टॉयलेट, पिण्याचा व वापराच्या पाण्याचे नळ/टाकी इ. वेगळे करावे. सदर कुटुंबाशी प्रत्यक्ष संपर्क न करता फोनवर संपर्क करावा. बाथरूम, टॉयलेट, पिण्याचा व वापराच्या पाण्याचे नळ/टाकी या सुविधा सार्वजनिक असल्यास या कुटुबांचे महानगरपालिकेच्या Quarantine Centre मध्ये विलगीकरण करावे. कोणीही त्यांच्या शारीरिक संपर्कात येणार नाहीत याची काळजी घ्यावी.

सर्वांना आवाहन

पुढील 3 महिन्यांत कदाचित कोरोनाची लस उपलब्ध होईल. त्यामुळे पुढील तीन महिने आपण सर्वांनीच काळजी घ्यायची आहे. हा आजार गंभीर आहे. त्यामुळे कंटाळा आला म्हणून बेफिकीर होऊ नका. आपण आजवर खूप फिरलो. आता काही काळ घरी बसायला हरकत नाही. तेव्हा मास्क लावा, हात साबणाने धुवा, कच्चे पदार्थ खाऊ नका, सामान काही वेळ दाराबाहेर ठेवून मगच घरात घ्या. गरम पाणी घ्या व स्वतःची काळजी घ्या. आपल्यामुळे इतरांना लागण होणार नाही याची काळजी घ्या.

Please remember that early diagnosis is very important. There are good drugs to treat mild disease. Ayurveda plays an important role in prevention of this disease.

श्वसनाचे व्यायाम, शारीरिक व्यायाम, ताजे व सकस अन्न, दरोरोज 6-8 तास विश्रांती आवश्यक आहे. निरनिराळी आयुर्वेद काढे प्रतिकारशक्ती वाढविण्यात निश्चितच मदत करतात.

(लेखक बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे शल्यचिकित्साशास्रचे प्राध्यापक आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकचे प्रति कुलगुरू आहेत.)

आपली प्रतिक्रिया द्या