
सामना प्रतिनिधी । सेलू
गतवर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांची पिके हातची गेली. तसेच शेतीमालाला भाव नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांनी आपल्या खरीप हंगामातील पिकांचा विमा उतरवून घेतला असताना मात्र विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना एकही रुपयाची आर्थिक मदत मिळाली नसल्याने शेतकरी आडचणीत सापडले आहेत.
तालुक्यामध्ये गतवर्षी पिकविमा रिलायन्स कंपनीकडून उतरवून घेतला होता. त्यापद्धतीने मध्यवर्ती बँक तसेच दत्तक बँकेमध्ये पिकविमाच्या हप्त्याची रक्कम भरुन घेतली होती. मात्र रिलायन्स कंपनीकडून उतरवण्यात आलेल्या पिकविम्याची रक्कम मिळाली नसल्याची तक्रार सोमवारी तालुक्यातील रायपूर येथील शेतकऱ्यांनी कृषी आयुक्ताकडे केली आहे. या गावातील शेतकऱ्यांनी मूग, सोयाबीन, तूर, कापुस व उडीद इत्यादी पिकांचा विमा उतरविला होता. तसेच सदर विम्याची रक्कम जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा वालूर तसेच देना बँक शाखा सेलू येथे प्रत्यक्ष जाऊन भरली होती. तसेच रायपूर हे गाव चिकलठाणा महसूल मंडळाअंतर्गत येते व सदरील मंडाची आणेवारी ४४ टक्के इतकी देण्यात आली आहे. तसेच खरीपाची पीके अल्प पावसामुळे वाया गेली तसेच बोंडअळीमुळे कपासी पीकांचे नुकसान झाले.
आणेवारीनुसार सदरील मंडळ हे विमा अनुदानासाठी पात्र असतानाही काही शेतकऱ्यांना विमा, कंपनीकडून एक रुपयाचे सुद्धा विमा कवच मिळाले नाही. केवळ विमा कंपनीने विमा उतरवून घेतला मात्र नुकसान झालेल्या पिकांच्या विमा रक्कम शेतकऱ्यांना दिली नाही. वेळोवेळी सदरील शेतकऱ्यांनी कृषी विभाग व विमा कंपनीकडे तक्रारारी देऊन सुद्धा अद्यापपर्यंत तक्रारींची दखल घेण्यात आली नाही. तसेच पिकांचा विमा उतरवून घेतला मात्र विम्याची रक्कम शेतकऱ्यांना दिली नसल्याने विमा कंपनीने शेतकऱ्यांची एक प्रकारे फसवणूक केली असून या संदर्भात गांभीर्याने दखल घेवून शेतकऱ्यांना योग्य न्याय देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.


































































