शेतकऱ्यांच्या बांधावरून गोफण होतेय कालबाह्य, गोफणकला जोपासण्याची शेतकऱ्यांची भावना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गोफणीच्या जोरावर इंग्रजांना सळो की पळो करून सोडणाऱ्या आद्यक्रांतिकारक शूरवीर राजे उमाजी नाईक यांची गोफण चालविण्याची कला आधुनिकतेच्या जमान्यात शेतकऱ्यांच्या बांधावरून कालबाह्य होताना दिसत आहे. ही गोफणकला जोपासायला हवी, अशी भावना गोफणकला अवगत असणाऱ्या शेतकरी बांधवांकडून व्यक्त केली जात आहे.

शेतातील पिके पक्षी व प्राण्यांनी खाऊ नयेत म्हणून त्यांना दगड मारून पळविण्यासाठी पूर्वीपासून गोफणीचा वापर केला जात असे; परंतु आधुनिक शेतीबरोबरच काळाच्या ओघात गोफण चालविण्याची कला नष्ट होत चालली आहे. गोफण हे शेतातील धान्य पक्ष्यांनी खाऊ नये, यासाठी बनविण्यात आलेले मानवचलित उपकरण आहे. गोफासारखी विणलेली असल्याने त्यास ‘गोफण’ असे नाव पडले आहे. दोन दोऱ्यांच्या मध्यभागी अडकविलेल्या कातडी पट्ट्यात पक्ष्यांना हुसकावून लावण्यासाठी दगड ठेवला जातो. त्यानंतर दोरीच्या एका टोकाला असलेल्या फासामध्ये हाताचे मधले बोट अडकविले जाते. दोरीचे दुसरे टोक हाताचा अंगठा आणि तर्जनीच्या बोटामधील बेचक्यात घट्ट धरून ठेवले जाते. त्यानंतर गोफण हातात धरून वेगाने स्वतःच्या डोक्याभोवती चक्राकार आणि जमिनीस समांतर अशी फिरविली जाते. गोफणीमधील कातडी पट्टा आणि दगड चक्राकार गतीने गोल गोल फिरू लागतात. पुरेसा वेग आल्यावर योग्य क्षणी अंगठा व तर्जनी यामध्ये पकडलेले दोरीचे टोक सोडून दिले की, मधल्या कातडी पट्ट्यात ठेवलेला दगड नेम धरलेल्या जागेवर जाऊन पडतो.

दगड कुठे जाऊन पडावा वा कुठे लागावा, यासाठी कौशल्याचीदेखील गरज असते. दगडाचा मारा व मोठ्या आवाजाने पिकांवर बसलेले पक्षी पळून जातात. पक्ष्यांपासून पिकांचा बचाव करता येतो. शेतकऱ्यांच्या घरात खुंटीला गोफण टांगलेली दिसायची. मात्र, शेती व्यवसायाला आधुनिकतेची जोड मिळाल्याने आता ‘गोफण’ हा प्रकार, तसेच गोफण चालविण्याची कला शेतकऱ्यांच्या बांधावरून नष्ट होत चालली आहे. ही कला पुढील पिढीसाठी जोपासण्याची आवश्यकता असल्याचे शेतकरी बांधवांनी म्हटले आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर गोफण खेळाचा वेगाने प्रसार

गोफणीचे दोन प्रकार पाहायला मिळतात. एक म्हणजे, चामड्याच्या पट्ट्याला दोन दोऱ्या बांधलेली गोफण आणि दुसरी काठीच्या डेलक्याला बांधलेली गोफण. गोफण हे हाताने फेकण्याच्या अस्त्रांमध्ये सर्वांत प्राचीन अस्त्र आहे. अनेक आदिवासी जमाती गोफणीचा वापर करतात. आता 21व्या शतकात खेळ म्हणून उदयास येत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर या खेळाचा वेगाने प्रसार होत आहे. गोफणमुळे शेतकरी व त्यांच्या मुलांना क्रीडाक्षेत्रात नवे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. हा खेळ जगामधील 36 देशांमध्ये पोहोचला आहे. अश्मयुगापासून ते छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप यांच्या सैन्यातदेखील शस्त्र म्हणून गोफणीचा वापर केला जात असे.