पुणतांब्याच्या शेतकरीकन्यांचे अन्नत्याग आंदोलन मागे, कृषी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची यशस्वी मध्यस्थी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, नगर

कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी पुणतांबा गावात अन्नत्याग आंदोलनाला बसलेल्या शेतकरीकन्यांनी आज अखेर पाचव्या दिवशी आंदोलन मागे घेतले. आंदोलक मुलींच्या मागण्यांची सरकारने दखल घेतली असून त्या पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करू असे आश्वासन कृषी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दिल्यानंतर शेतकरीकन्यांनी आंदोलन मागे घेतले.

गेल्या पाच दिवसांपासून पुणतांब्यात हे आंदोलन सुरू होते. आंदोलनकर्त्या शेतकरीकन्यांची प्रकृती बिघडल्याने शुक्रवारी पोलिसांनी त्यांना रुग्णालयात हलविले होते. पोलिसांनी बळाचा वापर केल्यामुळे गावात तणाव निर्माण झाला होता. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कृषी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी आंदोलनकर्त्या शेतकरीकन्यांची भेट घेतली. आंदोलक मुलींच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून लवकरच निर्णय घेऊ असे खोतकर यांनी सांगितले. आंदोलनादरम्यान पोलीस प्रशासनाकडून झालेल्या दडपशाहीच्या प्रकाराची चौकशी केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

लढाई संपलेली नाही -शुभांगी जाधव
आमची लढाई अजून संपलेली नाही. जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आम्ही आणखी 10 मुलींना घेऊन अन्नत्याग आंदोलन सुरू करू’ असा इशारा शुभांगी जाधवने दिला. ‘पुणतांब्यात काय चालले आहे याची आम्हाला माहिती नाही. मायबापासाठी आमची लढाई आहे. आमच्या आंदोलनाकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यायला पाहिजे होते’, असेही शुभांगीने म्हटले आहे.

जिल्हा रुग्णालयात पोलिसांचा गराडा
काल रात्रीपासून पोलिसांनी आंदोलनस्थळी वॉच ठेवला होता. पोलिसांनी आंदोलनकर्त्या शेतकरीकन्यांना विनंती करून रुग्णालयात जाण्याचे आवाहन केले. यानंतर मध्यरात्रीच पोलिसांनी त्यांना नगर येथील जिल्हा रुग्णालयात हलविले. त्यानंतर पोलिसांनी जिल्हा रुग्णालयात सुरक्षा वाढविली होती.

आंदोलकांच्या मागण्या
सातबारा कोरा करा.
स्वामिनाथन आयोगानुसार पिकाला हमीभाव द्या.
दुधाला लिटरमागे 50 रुपये दर द्या.
ट्रक्टर व अन्य कृषिपयोगी अवजारांवर 100 टक्के अनुदान द्या.
शेतीशी संबंधित वस्तूंवरील जीएसटी रद्द करा.