
रिलायन्स जियोला शेतकरी आंदोलनाचा फटका बसला आहे. जियोच्या ग्राहकांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे. ट्रायने जारी केलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. पंजाब आणि हरयाणा राज्यात जियोच्या ग्राहकांची संख्या घटली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार नोव्हेंबर 2020 पर्यंत पंजाबमध्ये जियोचे एक कोटी 40 लाख ग्राहक होते. डिसेंबरमध्ये त्यात घट होऊन त्यांची संख्या 1 कोटी 25 लाखांवर आली आहे. गेल्या 18 महिन्यांत ही सर्वाधिक घट आहे. यापूर्वी डिसेंबर 2019 मध्ये अशा प्रकारे ग्राहकांची संख्या कमी झाली होती. पण त्यावेळी जियोच नव्हे तर बीएसएनएल सोडून सर्वच खासगी टेलिकॉम ऑपरेटर्संना फटका बसला होता.
तर दुसरीकडे हरयाणात नोव्हेंबर 2020 मध्ये जियोचे 94 लाख 48 हजार ग्राहक होते. तर डिसेंबरमध्ये त्यांच्या संख्येत घट होऊन 89 लाख 9 हजार इतकी झाली. हरयाणामध्ये 2016 साली जियो लॉन्च झाले त्यानंतर पहिल्यांदाच एवढ्या प्रमाणात ग्राहकांची संख्या घटली आहे.
ट्रायने दिलेल्या माहितीनुसार डिसेंबर 2020 मध्ये जिओने 4 लाख 98 हजार नवीन ग्राहक जोडले.तर याच दरम्यान एअरटेलने 40 लाख 51 हजार नवे ग्राहक जोडले. म्हणजेच एअरटेलने जियोच्या 10 पट अधिक ग्राहक मिळवले होते. तर दुसरीकडे व्होडाफोन आयडीयाने जवळ जवळ 56 लाख 9 हजार ग्राहक गमावले.
जियोचा एअरटेल व्होडाफोनवर आरोप
शेतकरी आंदोलनादरम्यान शेतकर्यांनी जियोचे टॉवर पाडले होते. तेव्हा जियोने याचा आळ एअरटेल आणि व्होडाफोनर घेतल होता. या दोन्ही कंपन्या आपल्या विरोधात अभियान राबवत असल्याचे जियोने म्हटले आहे. तसेच जियोशी पोर्ट करून इतर कंपनीचे सिम घेतल्यास शेतकरी आंदोलनाला पाठिंबा मिळेल असा प्रचारही एअरटेल व्होडाफोनने केल्याचे जियोने म्हटले होते.
जियोने या प्रकरणी ट्रायला पत्र लिहून एअरटेल आणि व्होडाफोनविरोधात कारवाई करण्याची मागणी केली होती. तर एअरटेल आणि व्होडाफोनने सर्व आरोप फेटाळले होते.



























































