
सामना प्रतिनिधी । नगर
पावसाच्या अपेक्षेने नगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शेतकर्यांनी खरिपाच्या पेरणीपूर्व मशागतीस सुरुवात केली असून काही भागात मशागती अंतिम टप्प्यात आल्या आहेत. शेतकर्यांनी खरिपासाठी खते बी-बियाणे खरेदी करण्यासाठी कृषी सेवा केंद्रांमध्ये गर्दी केली आहे. त्यामुळे आता शेतकर्यांना जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडेल अशी अपेक्षा आहे.
नगर जिल्ह्यात गेल्या वर्षी जून ते ऑक्टोबर या कालावधीत केवळ 70 टक्के पाऊस झाला होता. त्यामुळे खरीप हंगामात तीन लाख 45 हजार हेक्टर क्षेत्रावर पेरण्या होऊनही केवळ पावसाअभावी सर्व हंगाम वाया गेला होता. हीच स्थिती रब्बी हंगामाची होती. रब्बीचे क्षेत्र सात लाख हेक्टर क्षेत्र असताना तब्बल सहा लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बीच्या पेरण्या झाल्या. मात्र, पावसाअभावी रब्बी हंगामही वाया गेला. खरीप व रब्बी हे दोन्ही हंगाम वाया गेल्यामुळे ग्रामीण भागात शेतकरी हवालदिल झाले होते. हवामान खात्याने यंदा चांग़ल्या पावसाचा अंदाज वर्तवल्याने शेतकर्यांच्या आशा प्रफुल्लित झाल्या आहेत. चार महिन्यांपासून दुष्काळाबरोबर दोन हात करताना जिल्ह्याचा ग्रामीण भाग पूर्णपणे कोलमडून गेला आहे. दुष्काळामुळे नगर जिल्ह्यात फळबागा जळण्याच्या मार्गावर आहेत. तर काही भागात बागा पूर्णपणे जळाल्या आहेत. अनेक ठिकाणी टँकरद्वारे फळबागा जगवण्याचे काम शेतकरी करत आहेत. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून नगर जिल्ह्यातील नगर, श्रीगोंदे, नेवासे, पाथर्डी, शेवगाव, जामखेड, कर्जत, पारनेर, संगमनेर, अकोले, श्रीरामपूर, कोपरगाव या तालुक्यांमध्ये शेतकर्यांनी खरिपासाठी पेरणीपूर्व मशागत सुरू केली आहे. लवकरच पाऊस सुरू होईल या अंदाजाने शेतकर्यांनी खते व बी- बियाणे खरेदी करण्यासाठी कृषी सेवा केंद्रांमध्ये गर्दी सुरू केली. काही भागात खरिपासाठी नांगरणी सुरू झाली आहे. जिल्ह्यात खरिपाच्या पेरणीपूर्व मशागती अंतिम टप्प्यात आल्या आहेत. खरीप हंगामात सहा लाख हेक्टर क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या करण्याचे उद्दिष्ट कृषी विभागाने ठेवले आहे. काही भागात मशागती पूर्ण झाल्या असून मान्सूनपूर्व पावसाची शेतकर्यांना प्रतीक्षा लागलेली आहे.




























































