मराठा आरक्षणासाठी शेतकर्‍याने गळफास घेऊन जीवन संपविले, दिवसभरातील दुसरी आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी घनसावंगी तालुक्यातील अंतरवाली टेंभी येथे 26 ऑक्टोंबर रोजी दुपारी 11 च्या सुमारास एका अल्पभूधारक शेतकर्‍याने राहत्या घरात दरवाज्याच्या कोंड्याला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. शिवाजी अण्णाकिसन माने (48 ) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांच्या पश्चात वृद्ध आई वडील, पत्नी, दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे. त्यांना दोन एकर शेती असून त्यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

घनसावंगी तालुक्यातील अंतरवाली टेंभी येथे देखील गुरुवारपासून परिसरातील गावकरी मिळून सकाळी उपोषणाला बसण्याची तयारी करत होते. त्या तयारीत शिवाजी माने देखील सहभागी झाले होते. उपोषणस्थळी तयारी पूर्ण करून उपोषणाला सुरुवात झाली होती. त्याच दरम्यान शिवाजी माने यांनी 11च्या सुमारास घरी जाऊन घरात आत्महत्या केल्याची खबर मिळाल्याने उपोषणार्थींनी तिकडे धाव घेतली. दरम्यान गावकर्‍यांनी शिवाजी माने यांना तातडीने दवाखान्यात हलविले तेथे डॉक्टरांनी माने यांना मृत घोषित केले. याप्रकरणी तीर्थपुरी पोलीस ठाण्यात मावसभाऊ संतोष उबाळे यांच्या तक्रारीवरून घटनेची नोंद करण्यात आली असून अधीक तपास एपीआय सतिष दिंडे हे करत आहेत