1 कोटी 32 लाख टन उसाची राज्यात काटामारी, कारखानदारांकडून साडेचार हजार कोटींवर डल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात दरवर्षी 1 कोटी 32 लाख मेट्रिक टन उसाची चोरी होते. यातून शेतकऱयांच्या मालावर कारखानदार सुमारे साडेचार हजार कोटी रुपयांचा दरोडा टाकतात. हे रोखण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रयत्नशील आहे. याकरिता प्रत्येक जिल्ह्यात वजनकाटा उभारण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी या वजन काट्यावर वजन करून आपली फसवणूक टाळावी, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले आहे.

पंढरपूर तालुक्यात रोपळे येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने वजन काटा उभारण्यात आला आहे. या वजनकाटय़ाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते पत्रकारांशी  बोलत होते.

राजू शेट्टी म्हणाले, राज्यात यावर्षी सुमारे 196 कारखाने सुरू झाले आहेत. दरवर्षाला 1 कोटी 32 लाख मेट्रिक टन उसाची चोरी होते. त्यातून सुमारे साडेचार हजार कोटींचा डल्ला साखर कारखाने मारतात. त्याला चाप लावण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिह्यात प्रत्येक ठिकाणी वजनकाटे बसवण्यात येणार आहेत. नाममात्र किमतीमध्ये शेतकऱयांना वजनकाटे उपलब्ध करून दिले जाणार आहेत. साखर कारखाने बाहेरून वजन करून आणलेल्या उसाचे वजन ग्राह्य धरत नसल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत साखर आयुक्त व वजन मापन आयुक्तांकडे तक्रार केली आहे. त्यांनी बाहेरून वजन करून आणलेली वजने ग्राह्य धरण्याचे आदेश दिले आहेत. जे कारखानदार आदेश पाळणार नाहीत, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच पुढील वर्षापासून प्रत्येक कारखान्याने इलेक्ट्रॉनिक्स काटे बसवावेत, असे आदेश साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

एकरकमी एफआरपी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांसमोर बैठक झाली होती. मात्र, त्याचे आदेश न निघाल्याने कारखाने एकरकमी एफआरपी देत नाहीत. त्यासाठी आता नवीन धोरण अवलंबणार असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वबळावर स्थानिक आघाडय़ांकडून लढणार असल्याचे त्यांनी सांगितले.