बोंडअळी रक्कमेत अफरातफर करणाऱ्या ग्रामसेवकाला निलंबित करा, शेतकऱ्यांचा तक्रार अर्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, कोपरगाव

तालुक्यातील खिर्डी गणेश ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सुमित गोसावी यांनी शासनाकडुन बोंडअळी नुकसानीबद्दल शेतकऱ्यांसाठी आलेल्या 51 हजार रूपये भरपाई अनुदानात अफरातफर केली. तेव्हा त्यांची चौकशी होऊन निलंबन व्हावे, अशी मागणी शेतकरी निलेश दादा वराडे व अन्य आठ जणांनी जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्याकडे तक्रार अर्ज केला आहे.

त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, मौजे खिर्डीगणेश येथील सर्व्हे नंबर 41/7 मध्ये पन्नास गुंठे क्षेत्रावर कापसाची लागवड केली होती. मात्र त्यावर मोठया प्रमाणांत बोंडअळीचा प्रार्दुभाव होऊन नुकसान झाले त्याबाबत 14 डिसेंबर 2017 रोजी शासनांने संबंधित गांवचे कामगार तलाठी, ग्रामसेवक व कृषिअधिकारी, पोलीस पाटील, सरपंच यांना प्रत्यक्षात घेऊन पंचनामे केले. शासनाने नुकसान झालेल्या क्षेत्रास मदतीची रक्कमही दिली. ती तहसिलदार कोपरगांव यांनी आमचे मदतीची 51 हजार रुपयाची रक्कम खिर्डीगणेश येथे पाठविली. परंतु, गावचे ग्रामसेवक सुमित गोसावी यांनी प्रत्यक्षात पंचनामे झालेल्या व नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या यादीमध्ये फेरफार करून माझ्यासह अन्य सात शेतकऱ्यांची नावे गाळून पंचनामा व नुकसान न झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम वर्ग करून त्यात मोठ्या प्रमाणांत अपहार केला आहे,

यासंदर्भात तहसिलदार कोपरगांव यांच्याकडे 20 व 21 डिसेंबर 2018 रोजी तसेच 5 फेब्रुवारी रोजी तक्रार केली. पण, त्यावर कुठलीही कारवाई झाली नाही, तेव्हा याबाबत न्याय मिळावा व बोंडअळी नुकसान भरपाई मिळावी, यासाठी 26 मार्च पासुन उपोषण करण्यांचा निर्णय घेतला आहे. या तक्रारीच्या प्रती मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नगर, पोलीस निरीक्षक कोपरगांव व तहसिलदार यांच्याकडे दिल्या, आहे असेही ते म्हणाले.