बंधाऱ्यात पाणी सोडण्यासाठी शेतकऱ्यांनी अडवली पालकमंत्री लोणीकरांची गाडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । तीर्थपुरी

जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील मंगरूळ बंधाऱ्यासाठी जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याचा प्रशासकीय पातळीवर निर्णय होऊनही अचानक कालव्याचे पाणी बंद केल्याने या बंधाऱ्यावर अवलंबून असलेल्या 15 गावातील जनावरांसह माणसांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट होण्याच्या मार्गावर आहे. अशा विवंचनेत असलेल्या शेतकऱ्यांनी 7 डिसेंबरला जालन्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांची गाडी अडवली.

लोणीकर हे शुक्रवारी घनसावंगी तालुक्यातील गोदाकाठी असलेल्या शेवता येथील पाणी पुरवठा योजनेच्या भूमीपूजनाला येणार असल्याचे समजल्याने पालकमंत्र्याकडे मंगरूळ बंधाऱ्यात पाणी सोडण्याविषयी मागणी करण्यासाठी भोगगाव व बानेगाव येथील गावकरी शेवता येथे एकत्र आले होते. पालकमंत्री लोनिकरांना शेवता गावातील कार्यक्रमात निवेदन न देता गावकऱ्यांनी गावापासून अर्धा की.मी.अंतरावर शेवता फाट्यावरच मंत्र्यांच्या गाड्याचा ताफा अडवून मंगरूळ बंधाऱ्यात पाणी सोडण्याची मागणी केली. यावेळी असे फाट्यावर थांबायचे का कार्यक्रमाच्या ठिकाणी निवेदन देता आले असते, असे म्हणून मंत्री लोणीकरांनी निवेदन स्विकारले. मुरमा ते भोगगाव रस्ता दुरुस्त करण्याच्या मागणीचे निवेदन भोगगाव व बानेगावच्या गावकऱ्यांनी त्यांना दिले. दरम्यान मंगरूळ बंधाऱ्यासाठी जायकवाडीतून पाणी सोडण्याविषयी अधिकाऱ्यांना मी खूप झापले असून येत्या 5 दिवसांत बंधाऱ्यासाठी पाणी सोडण्याच्या प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. त्यासाठी लेखी आदेशही काढल्याचे पालकमंत्री लोनिकरांनी यावेळी बोलताना सांगितले.

दरम्यान, आमदार राजेश टोपे यांनी बंधाऱ्यात पाणी सोडण्याचे श्रेय घेण्याचे कारण नाही. पाणी सोडण्याच्या कुलपाची चावी माझ्या हातात आहे. कारण कुलूप आता बारामतीचे नसून नागपूरचे असल्याचा टोला लोणीकरांनी टोपे यांना लगावला.