
पाय लागल्याचा जाब विचारल्याने दोघाजणांनी तरूणाला मारहाण करून कोयत्याने वार केल्याची घटना रविवारी रात्री साडेबाराच्या सुमारास धनकवडीत घडली. हल्ल्यात कल्पेश देशमुख (वय 26, रा. बालाजीनगर, धनकवडी) जखमी झाले आहेत. याप्रकरणी त्यांचा मित्र अरूण साळुंखे यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्पेश आणि अरूण मित्र असून रविवारी रात्री साडेबाराच्या सुमारास ते धनकवडीतील ओसवाल इमारतीसमोर गप्पा मारत बसले होते. त्यावेळी तेथे आलेल्या एका तरूणाचा पाय कल्पेशला लागला. त्याने पाय लागत असल्याचे संबंधिताला सांगितले. त्यावरुन संबंधिताने उर्मट उत्तर दिल्याने त्यांच्यात वाद झाला. वाद वाढल्याने त्या संबंधित व्यक्तीने साथीदाराला बोलावून कल्पेशवर कोयत्याने वार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलीस निरीक्षक युनूस मुलाणी तपास करीत आहेत.
























































