
सामना ऑनलाईन । अहमदपूर
लातूर – नांदेड राज्य महामार्गावर एका दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीवरील बाप-लेकाचा जागीच जागीच मृत्यू झाला असून आई गंभीर जखमी झाली आहे. गोविंद शिवाजी शिरमवार (36) व त्यांचा मुलगा गौरव शिरमवार (6) अशी मृतांची नावं असून सुप्रिया गोविंद शिरमवार (30) ही महिला गंभीर जखमी झाली आहे. जखमीला अहमदपूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
शिरुर ताजबंद येथून धानोरा (तीर्थ) या गावाकडे निघालेल्या शिरमवार यांच्या दुचाकीला येथील तात्या पेट्रोल पंपाजवळ रविवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या प्रकरणी अहमदपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास अहमदपूर पोलीस करीत आहेत.




























































