
सामना प्रतिनिधी, लातूर
पत्नी आणि मुलास न विचारता का घेऊन आले अशी विचारणा करणाNया जावयाचे सासऱ्याने काठीने डोके फोडल्याची घटना उदगीर तालुक्यातील क्षेत्रपाळ येथे घडली.
या प्रकरणी विठ्ठल भारत वाघमारे याने उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, फिर्यादीचा सासरा नरसिंग तुकाराम श्रीमंगले यांनी फिर्यादीस न विचारता हिंपळनेर येथून मुलीस व नातवास क्षेत्रपाळ येथे घेऊन गेले. त्यामुळे फिर्यादी व त्याचा मित्र तुकाराम अलगुले हे मोटरसायकलवर फिर्यादीच्या सासरवाडीत क्षेत्रपाळ येथे गेले. सासऱ्यास मी घरी नसताना बायको व मुलाला का घेऊन आलात अशी विचारणा केली असता त्यांनी फिर्यादीस काठीने डोक्यात मारून डोके फोडले. हातावर मारहाण करून मुका मार दिला. फिर्यादीच्या डोक्यात चार टाके पडले असून हाताच्या मनगटाजवळ जखम झाली आहे. या प्रकरणी पोलीसांनी नरसिंग तुकाराम श्रीमंगले याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.




























































