
कच्ची फळे झटपट पिकण्यासाठी आंब्यांवर इथिलीन या घातक केमिकलचा स्प्रे मारणाऱ्या एपीएमसी मार्केटमधील व्यापाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) धडक कारवाई करून साडेतीन हजार किलो आंबे जप्त केले. या आंब्यांची किंमत सुमारे 11 लाख 12 हजार रुपये आहे. एफडीएच्या या कारवाईमुळे ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या व्यापाऱ्यांची पळापळ उडाली आहे. एपीएमसी मार्केटच्या बाहेर असलेल्या गोदामांवरही एफडीएच्या पथकाने धाडी टाकल्या आहेत.
कृत्रिमरीत्या आंबे पिकवण्यासाठी केमिकलचा स्प्रे करण्यास शासनाने बंदी घातली आहे. तरीही नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमधील अनेक व्यापारी इथिलीन या घातक रसायनाचा वापर करतात. याबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्यानंतर एफडीएच्या पथकाने एपीएमसी मार्केट आणि सानपाडा परिसरातील व्यापाऱ्यांच्या गोदामांवर धाडी टाकल्या. त्यावेळी तिथे आंब्यांवर इथिलीनचा स्प्रे करण्याचे काम सुरू होते. या गोदामांमधून 3 हजार 453 किलो आंबे जप्त करण्यात आले आहेत. जप्त केलेल्या आंब्यांचे नमुने पुढील तपासणीसाठी आणि विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर पुढील कडक कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
व्यापारी नियमांचे उल्लंघन करून थेट फळांवरच स्प्रे मारताना रंगेहात पकडले गेले. या तपासणीत कॅल्शियम कार्बाईडसारख्या अत्यंत जीवघेण्या आणि घातक रसायनाचा वापर कुठेही आढळून आलेला नाही, परंतु इथिलीन स्प्रेचा चुकीचा वापर होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाच्या नियमांनुसार आंबे किंवा इतर फळे पिकवण्यासाठी थेट फळांवर इथिलीन स्प्रे मारण्यास सक्त मनाई आहे. व्यापाऱ्यांनी नियमानुसार सुरक्षित अशा इथिलीन गॅस चेंबरचाच वापर करणे बंधनकारक आहे.





























































