
बिहारमधील मोतीहारी येथे एका गरोदर महिलेने सुदृढ बाळाला जन्म दिला. बाळाच्या जन्माने घरातील सदस्य आनंदित होते. मात्र महिनाभरातच त्यांना बाळाबाबत एक अशी माहिती कळली की त्यांना त्यांच्या कानावर विश्वासच बसेना.
या बाळाचे पोट मोठे होत चालले होते व तसेच लघवीला देखील त्याला त्रास होत होता. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी त्या बाळाला रुग्णालयात नेले. तिथे त्याच्या काही टेस्ट करण्यात आल्या. सोनोग्राफी, सिटीस्कॅन करण्यात आले. त्याचे जेव्हा रिपोर्ट आले तेव्हा डॉक्टरांना देखील धक्का बसला. त्या मुलाच्या पोटात एक भ्रूण वाढत होते. त्याच्या वाढत्या आकारामुळे त्याचे पोट देखील मोठे होत होते. या आजाराला फिट्स इन फिटू असे मेडिकल भाषेत म्हटले जाते. हा फारच दुर्मिळ आजार असून पाच लाख बाळांमधून एकाला होतो.
डॉक्टरांनी जेव्हा त्या बाळाच्या पालकांना हे सांगितले तेव्हा त्यांना धक्काच बसला. त्यानंतर डॉक्टरांनी त्या एक महिन्याच्या बाळावर शस्त्रक्रीया केली व त्याच्या पोटातील ते भ्रूण काढले. आता त्या बाळाची प्रकृती ठीक असून त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
























































