
सामना ऑनलाईन । उल्हासनगर
उल्हासनगर शहर सध्या तापाने फणफणले आहे. शहराच्या सर्वच भागात तापाच्या रुग्णांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली असून त्यामध्ये डेंग्यूचे 26 संशयित रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणेची झोप उडाली आहे. दोन रुग्णांना डेंग्यू पॉझिटिव्ह असल्याचे उघड झाल्यामुळे नागरिकांमध्ये घबराट उडाली आहे.
पावसाळा सुरू झाल्यानंतर फैलाव झालेल्या साथीच्या आजारांवर शहरातील आरोग्य यंत्रणेला नियंत्रण मिळवण्यात यश आले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून शहरात तापाच्या रुग्णांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली. या रुग्णांच्या विविध तपासण्या केल्या असता त्यापैकी 26 रुग्ण हे डेंग्यूचे संशयित आढळले तर दोन रुग्णांना डेंग्यू झाल्याचे उघडकीस आले. त्यामध्ये शहरातील कॅम्प नंबर 4 मध्ये राहणारे वास्तुविशारद अतुल देशमुख यांचा मुलगा अनिरुद्ध याचाही समावेश आहे.
पाण्याचे नमुने घेणार
ज्या भागात डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. त्या परिसरातील आणि सोसायटय़ांमधील पाण्याचे नमुने घेण्यात येणार आहेत. अनिरुद्ध देशमुख यांच्याही गुरुदत्त सोसायटीमधील पाण्याचे नमुने घेतल्यानंतर आवश्यक ती उपाययोजना करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. राजा रिजवानी यांनी दिली.
दवाखान्यांमध्ये गर्दी
वातावरणात बदल झाल्यामुळे सध्या सर्दी आणि खोकल्याने नागरिकांना हैराण केले आहे. त्यातच आता तापाची साथ सुरू झाल्याने शहरातील सर्वच खासगी आणि सरकारी दवाखान्यांमध्ये रुग्णांची जत्रेसारखी गर्दी झाली आहे. ज्या भागात डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत, त्या भागातील नागरिक भीतीच्या सावटाखाली वावरत आहेत.




























































