
मोरोक्कोवर अनेक दशके फ्रेंचने राज्य केले होते. आता मोरोक्को स्वतंत्र्य राष्ट्र आहे आणि तो फिफा वर्ल्ड कपचा इतिहास बदलण्यासाठी सज्ज झालाय. उपांत्य सामन्याच्या माध्यमातून का होईना, फ्रान्सवर राज्य करत मोरोक्कोने अंतिम फेरीत धडक मारण्याचे डावपेच आखले आहेत तर फ्रान्स सलग दुसऱयांदा अंतिम फेरीत धडक मारण्याच्या इराद्यानेच अल बायत स्टेडियमवर उतरणार आहे. त्यामुळे उद्या इतिहास रचला जाणार की बदलला जाणार, हे काळच ठरवेल.
फिफा वर्ल्ड कपच्या इतिहासात आफ्रिकन खंडाच्या एकाही संघाने आजवर उपांत्य फेरी गाठली नव्हती. तो चमत्कार मोरोक्कोने करून दाखवला. आता मोरोक्कोला अंतिम फेरीत धडक मारण्याचा न भूतो न भविष्यति इतिहास रचायचा आहे. याच मोरोक्कोने स्पेन आणि पोर्तुगाल या युरोपियन शक्तींचा पाडाव करत हा टप्पा गाठला आहे, हे विसरून कदापि चालणार नाही. मोरोक्को अनेक वर्षे फ्रान्स राजवटीचा जुलूम सहन करीत होता. आता वेळ आलीय त्या जुलमाचा हिशेब चुकता करण्याची. 1912 ते 1956 यादरम्यान मोरोक्कोवर फ्रान्सचे राज्य होते.
बचावतंत्र विरुद्ध आक्रमण
मोरोक्कोने उपांत्य फेरीपर्यंत मारलेली मजल त्यांच्या बचावतंत्राच्या जोरावर मारली आहे. त्यांच्या अद्भुत बचावफळीने प्रतिस्पर्ध्याला एकही गोल करू दिले नाही. हा अपराजित संघ उपांत्य फेरीतही तोच करिश्मा करण्यासाठी उत्सुक आहे. मोरोक्कोच्या अचरफ हकीमी, हकीम झियेच, युसेफ अन नसिरी, वालीद शद्दिरा हे मोरोक्कोची ताकद बनले आहेत. मोरोक्कोच्या बचावाला भेदण्यासाठी फ्रान्स काही नव्या क््प्त्या लढवणार आहे. त्यासाठी किलीयन एम्बाप्पेच नव्हे तर ऑलिव्हियर जिरू, ऍण्टोइन ग्रिझमन, उस्मान डम्बेल, जॉर्डन हेंडरसन मोरोक्कोच्या बचावाला उद्ध्वस्त करण्याचे डावपेच आखत आहेत.
फ्रान्स इतिहासाची पुनरावृत्ती करणार?
फ्रान्सला जे इटली आणि ब्राझीलला जमले आहे, ते करून नवा इतिहास रचायचा आहे. आजवर फुटबॉल वर्ल्ड कपच्या इतिहासात सलग दोन वर्ल्ड कप इटली (1934, 1938) आणि ब्राझील (1958, 1962) हे संघच जिंकू शकले आहेत. तसेच जगज्जेतेपद पटकावल्यानंतर पुढच्या स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानणाऱया संघाच्या यादीतही ब्राझीलचे (1994, 1998) नाव आहे. त्याच्याअगोदर अर्जेंटिनालाही (1986, 1990) हे दुःख सहन करावे लागले होते. पश्चिम जर्मनी आणि नेदरलॅण्ड्स हे संघ असे आहेत जे सलग दोन अंतिम सामन्यात हरलेत. त्यामुळे फ्रान्स कोणत्या इतिहासाची पुनरावृत्ती करतो, ते निकालानंतरच कळेल.
आजची उपांत्य लढत
फ्रान्स-मोरोक्को -रात्री 12:30 वा.




























































