विजेत्या संघावर बक्षिसांचा वर्षाव

40

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

फिफा वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या पारितोषिक रकमेत यंदा भरघोस वाढ करण्यात आली आहे. त्यामुळेच यंदा जगज्जेतेपदाचा १८ कॅरेट सोन्याच्या झळाळत्या करंडकावर नाव कोरणाऱ्या फ्रान्स संघाला ३८ दशलक्ष डॉलर (जवळपास २६० कोटी रुपये) इतके घसघशीत पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. उपविजेतेपदावर समाधान मानावे लागलेल्या क्रोएशिया संघाला २८ दशलक्ष डॉलर (जवळपास १९१ कोटी रुपये) बक्षिस देऊन सन्मानित करण्यात आले. तिसऱ्या स्थानी राहिलेला बेल्जियमचा संघ २४ दशलक्ष डॉलर (जवळपास १६४ कोटी रुपये), तर चतुर्थ स्थानी राहिलेल्या इंग्लंडचा संघ २२ दशलक्ष डॉलर (जवळपास १५० कोटी रुपये) बक्षिसांचा मानकरी ठरला.

यंदाच्या फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये ३२ संघांची एकूण पारितोषिक रक्कम ७९१ दशलक्ष डॉलर म्हणजे जवळपास ५३ अब्ज रुपये एवढी आहे. गतवेळी २०१४ मध्ये ब्राझीलमध्ये झालेल्या वर्ल्ड कपपेक्षा ही रक्कम ४० टक्के अधिक होय. जगज्जेत्या संघाला मिळणारी रक्कमही गतवेळीपेक्षा ३० लाख डॉलर अधिक आहे. स्पर्धेत ५ ते ९ स्थानावर राहिलेल्या संघांना प्रत्येकी १८ दशलक्ष डॉलर, १० ते १६ स्थानावर राहिलेल्या संघांना प्रत्येकी १२ दशलक्ष डॉलर, तर १७ ते ३२ स्थानावर राहिलेल्या संघांना प्रत्येकी ८ दशलक्ष डॉलर बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.

मागील वर्ल्ड कपमध्ये एकूण बक्षिस रक्कम ही ५७६ दशलक्ष डॉलर होती. २०१० मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या वर्ल्ड कपमध्ये ही बक्षीस रक्कम ४२० दशलक्ष डॉलर होती. याचबरोबर स्पेनमध्ये १९८२ मध्ये झालेल्या वर्ल्ड कपमध्ये २० दशलक्ष डॉलर, मेक्सिकोमध्ये (१९८६) झालेल्या वर्ल्ड कपमध्ये २६ दशलक्ष डॉलर, इटलीमध्ये (१९९०) झालेल्या वर्ल्ड कपमध्ये ५४ दशलक्ष डॉलर, अमेरिकेत (१९९४) झालेल्या वर्ल्ड कपमध्ये ७१ दशलक्ष डॉलर, फ्रान्समध्ये (१९९८) झालेल्या स्पर्धेत १०३ दशलक्ष डॉलर, दक्षिण कोरिया व जपान यांच्या संयुक्त यजमानीत झालेल्या २००२ च्या वर्ल्ड कपमध्ये १५६.६ दशलक्ष डॉलर, तर जर्मनीत २००६ साली झालेल्या वर्ल्ड कपमध्ये २६६ दशलक्ष डॉलर इतकी बक्षीस रक्कम होती.

आपली प्रतिक्रिया द्या