मोताळा शहरात दोन गटात हाणामारी; परस्परविरोधी तक्रारीवरुन गुन्हे दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । बुलढाणा

क्षुल्लक कारणावरुन निर्माण झालेल्या भांडणाचे हाणामारीत रुपांतर झाल्याची घटना मोताळा शहरामध्ये मंगळवारी रात्री 10 च्या सुमारास घडली. दरम्यान परस्पर विरोधी तक्रारीवरुन बोराखेडी पोलीस ठाण्यांतर्गत दोन्ही गटांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शेख आसीफ शेख शरीफ (रा. वार्ड क्र.4) यांनी दिलेल्या तक्रारीमध्ये नमूद केले आहे की, शेख हमीद शेख बशीर व 30 जणांच्या जमावाने फिर्यादी व त्यांच्या साथीदारांना ‘तुम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश का घेतला’ या कारणावरुन लाठ्याकाठ्यांनी मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली. तर शेख जब्बार शेख मुसा (रा. वार्ड क्र.4) यांनी दिलेल्या तक्रारीमध्ये नमूद केले आहे की, शेख साजीद शेख सुपडू व जवळपास 40 जणांच्या जमावाने फिर्यादी व त्यांच्या साथीदारास लग्नामध्ये नाचण्याचे निमित्त करुन व मागील भांडण उकरून काढत काठ्या, लोखंडी रॉडने मारहाण केली व जखमी केले. दोन्ही गटांनी दाखल केलेल्या परस्पर विरोधी तक्रारीवरुन गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलीस निरीक्षक माधवराव गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. गजानन वाघ पुढील तपास करत आहे.

मोताळा शहरामधील आठवडी बाजारामध्ये झालेली मारामारी मोठी होती. दोन्ही गटाचे शेकडो लोक परस्परांसमोर लाठ्या घेवून हाणामारी करीत होते. परंतु बोराखेडी पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहचत परिस्थिती आटोक्यात आणली. दोन्ही गटामधील काही कार्यकर्त्यांना उपचारासाठी बुलढाणा येथे हलवल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.