
नगरमधील पोखर्डी शिवारातील नऊ गुंठे जागेवर अनधिकृत तारेचे कंपाउंड करून जागेवर अतिक्रमण केले. अतिक्रमण काढण्यासाठी 50 लाख रुपयांची मागणी केल्याप्रकरणी भाजप नगरसेवक स्वप्नील शिंदे यांच्यासह सात ते आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 31 डिसेंबर 2021 ते 9 जानेवारी 2022 या कालावधीत ही घटना घडली.
जागा मालक सुनंदा धुमाळ यांचे भाऊ डॉ. प्रकाश दादासाहेब जाधव (रा.समतानगर, सावेडी) यांनी या प्रकरणी शनिवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार नगरसेवक स्वप्नील शिंदे, सचिन रोहिदास शिंदे, अनिल ढवण (रा.वैदुवाडी, सावेडी) व इतर पाच ते सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोखर्डी शिवारातील गट नंबर 170 मधील 9 गुंठे जागा ही सुनंदा धुमाळ यांच्या मालकीची आहे. आरोपींनी या जागेला अनधिकृतपणे तारेचे कंपाउंड करून त्या ठिकाणी ‘स्वप्निल’ नावाचा बोर्ड लावला. अतिक्रमण काढण्यासाठी जाधव यांच्याकडे 50 लाख रुपयांच्या रकमेची मागणी केली. त्यांना शिवीगाळ दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे करत आहेत.
























































