अनगर नगरपंचायत निवडणुकीचा आज फैसला

सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या अनगर नगरपंचायत निवडणुकीतील नगराध्यक्ष निवडणुकीबाबत जिल्हा न्यायालयात उद्या (दि. 26) अंतिम सुनावणी होणार आहे. दरम्यान, मोहोळ नगरपरिषद व मैंदर्गी नगरपरिषदेतील दोन उमेदवारांचे अपिल न्यायालयाने फेटाळले आहे.

अनगर नगरपंचायत नगराध्यक्षपदाच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱयाने नामंजूर केल्याने त्यांनी जिल्हा न्यायालयात अपिल दाखल आहे. यावर दोन दिवस सुनावणी झाली असून, उद्या अंतिम निकाल लागण्याची शक्यता आहे.

सोलापूर जिह्यातील अनगर नगरपंचायत निवडणुकीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. नगराध्यक्षपदासाठी माजी आमदार तथा भाजपात प्रवेश केलेले राजन पाटील यांच्या सून प्राजक्ता पाटील या भाजपकडून, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उज्ज्वला थिटे यांनी व अपक्ष म्हणून सरस्वती शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

मात्र, उज्ज्वला थिटे यांचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱयांनी नामंजूर केला असून, त्याविरोधात थिटे यांनी जिल्हा न्यायालयात अपिल दाखल केले आहे. अपक्ष उमेदवार शिंदे यांनी माघार घेतल्याने राजन पाटील यांचे कार्यकर्ते बिनविरोध झाल्याचे सांगत प्राजक्ता पाटील यांच्या विजयाचा जल्लोष करत आहेत.

दरम्यान, जिल्हा न्यायालयात थिटे यांच्या अर्जावर दोन दिवस सुनावणी झाल्याने भाजपसह माजी आमदार राजन पाटील यांच्या समर्थकांत खळबळ उडाली. निवडणूक निर्णय अधिकाऱयांनी मंगळवारी उज्ज्वला थिटे यांच्या नामंजूर अर्जाबाबत आपली बाजू मांडली. या दोन्ही बाजूंच्या युक्तीवादानंतर बुधवारी अंतिम सुनावणी होऊन निकाल लागण्याची शक्यता आहे. या न्यायालयीन लढाईमुळे भाजपा व पाटील समर्थकांत तणावाची स्थिती असून, जिह्याचे लक्ष लागले आहे.

मोहोळ, मैंदर्गीतील उमेदवारांचा अर्ज फेटाळला

n मोहोळ नगरपरिषद निवडणुकीतील प्रभाग 5 ब मधील उमेदवार अविनाश तुकाराम पांढरे आणि मैंदर्गी नगरपरिषद निवडणुकीतील प्रभाग क्रमांक ‘6 अ’ च्या उमेदवार परवीनबानो म. मुजीब बांगी यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱयांनी त्रृटीमुळे नामंजूर केले आहेत. या दोघांनी जिल्हा न्यायालयात अपिल दाखल केले होते. यावर सुनावणी होऊन पांढरे व बांगी यांचे अपिल जिल्हा न्यायालयाने फेटाळले आहे.