पर्रीकर पंचत्वात विलीन,मिरामारच्या किनाऱ्यावर अलोट जनसागर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन,पणजी

गोव्याचे मुख्यमंत्री आणि देशाचे माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या पार्थिवावर मिरामार बीच येथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी जनसागर लोटला होता. यावेळी सर्वांनाच अश्रू अनावर झाले होते.

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे काल रविवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. साधं राहणीमान, स्वच्छ प्रतिमा आणि शेवटच्या श्वासापर्यंत ऑन डय़ुटी असलेला राजकीय नेता गमावल्याची भावना सर्व स्तरातून व्यक्त होत आहे. अंत्यदर्शनासाठी गोव्याच्या कानाकोपऱ्यातून नागरिकांची प्रचंड गर्दी उसळली होती. देशाच्या अनेक भागांतून त्यांचे मित्र, चाहते  अखेरचा निरोप देण्यासाठी पणजीमध्ये काल रात्रीपासून दाखल झाले होते.

सकाळी 9.30 ते 11 वाजेपर्यंत मनोहर पर्रीकर यांचे पार्थिव पणजी येथील भाजप कार्यालयात आणि त्यानंतर दुपारी 4.30 पर्यंत गोवा कला अकादमी येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. हजारो भाजप कार्यकर्ते, नागरिक आणि राजकीय नेत्यांनी अंत्यदर्शन घेतले.

  • संरक्षणमंत्री निर्मला सितारमन, केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंत्यदर्शन घेतले.
  • सकाळी 10.30 वाजता केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी अंत्यदर्शन घेतले.
  • केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना अंत्यदर्शना वेळी अश्रू अनावर झाले.
  • सायंकाळी 5 वाजता अंत्ययात्रा निघाली. फुलांनी सजविलेल्या लष्करी वाहनात पर्रीकर यांचे पार्थिव ठेवण्यात आला होता.
  • मिरामार बीच येथे सायंकाळी 6च्या सुमारास पुत्र उत्पल यांनी पार्थिवाला मुखाग्नी दिला. यावेळी अनेकांना अश्रू अनावर झाले. ‘मनोहर भाई अमर रहे’च्या घोषणा देण्यात आल्या.

पंतप्रधान मोदींसह अनेकांनी अंत्यदर्शन घेतले

दुपारी 2.30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी गोव्यात दाखल झाले. पंतप्रधानांनी गोवा कला अकादमी येथे मनोहर पर्रीकर यांच्या पार्थिवाला पुष्पचक्र अर्पण करून अंत्यदर्शन घेतले.