शहीद जवान केशव गोसावी यांना साश्रुनयनांनी अखेरचा निरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । सिन्नर

कश्मीरमधील नौशेरा सेक्टरमधील कलाल भागात तैनात असलेले सिन्नर तालुक्यातील श्रीरामपूर (शिंदेवाडी) येथील जवान केशव सोमगीर गोसावी (29) हे पाकच्या गोळीबारात रविवारी शहीद झाले. त्यांच्यावर सोमवारी रात्री उशिरा लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

याप्रसंगी पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार हेमंत गोडसे, जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णान, आमदार राजाभाऊ वाजे, जि. प. अध्यक्षा शीतल उदय सांगळे, आमदार अनिल कदम, तहसीलदार नितीन गवळी, पोलीस अधीक्षक संजय दराडे आदी उपस्थित होते.

रविवारी दुपारी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास पाकिस्तानी लष्कराने नौशेरा सेक्टरमधील प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवर अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये मराठा बटालियनचे जवान केशव गोळी लागून जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तेथे उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले.

जवान केशव गोसावी यांचे पार्थिव रात्री उशिरा दिल्लीहून ओझर विमानतळावर पोहचले. तेथून त्यांच्या श्रीरामपूर (शिंदेवाडी) येथील जन्मगावी आणण्यात आले. ‘अमर रहे, अमर रहे, जवान केशव गोसावी अमर रहे’चा जयघोष करण्यात आला. त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्य संस्कार करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

वयाच्या 19व्या वर्षी भरती
लष्करात नाईक पदावर कार्यरत असलेले केशव हे एक लोकप्रिय व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या पश्चात पत्नी यशोदा, वडील, दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. केशव यांचे चौथीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण शिंदेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत, माध्यमिक शिक्षण पंचाळे येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये तर त्यानंतर बारावीपर्यंतचे शिक्षण वावी येथे झाले होते. वयाच्या 19 व्या वर्षी ते सैन्यात भरती झाले होते.