
कुटुंबात कुटुंबप्रमुखाचे स्थान खूप मोठे असते. कुटुंबप्रमुख नसताना कुटुंबाची वाताहत होऊ शकते. जर कुटुंबाचे उत्पन्न थांबले तरी खर्च थांबत नसतात. प्राथमिक गरजांचे खर्च, मुलांच्या दैनंदिन शिक्षणाचा खर्च, कर्जाचे हप्ते हे तर सुरूच राहतात.
मृत्युयात्रेला आलेली सर्व मंडळी एकच कुजबुज करीत असतात, कसं होणार या कुटुंबाचं? कुणी आहे का घरात कमावणारं? आणि हळूहळू विचारणा सुरू होते, विमा होता का रे याचा?
कुटुंबाची जबाबदारी घ्यायला मात्र कुणीच पुढे येत नाही. मात्र देवदूतासारखी एक व्यक्ती समोर येते आणि सांगते, जाण्यापूर्वी यांनी विमा काढला होता ते पैसे मिळवून देण्यासाठी मी फॉर्म घेऊन आलो आहे. तेव्हा मात्र त्या हतबल झालेल्या व्यक्तीच्या चेहऱयावर एक आशेचा किरण दिसायला लागतो. चिंतेने व्यापलेल्या मनाला एक आधार मिळतो. आयुष्यात पुढे जाण्यासाठी. आर्थिक आधार देण्यासाठी कुणीच पुढे येत नाही तेव्हा मात्र विमा पॉलिसी कुटुंबाचा तारणहार म्हणून समर्थपणे उभी राहते. विमा पॉलिसी जर गरजेपेक्षा कमी असेल तर मात्र कुटुंबाला हालअपेष्टा सोसाव्याच लागतील. म्हणूनच प्रत्येक कुटुंबप्रमुखाने आपल्या महिन्याच्या उत्पन्नाच्या 200 पट विमा करायला हवा, ज्यामुळे व्याजदर जर 6 टक्के असेल तर त्याच्या महिन्याच्या उत्पन्नाइतके उत्पन्न घरी येईल व कुटुंबाच्या गरजा पूर्ण होतील. उदाहरण घ्यायचे झाले तर एका कुटुंबाचे मासिक उत्पन्न 50000/- असेल व कुटुंबप्रमुखाने 25 लाखांचा विमा काढला असेल तर त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर 25 लाख कुटुंबाला मिळतील. व्याजदर जर 6 टक्के असेल तर 12500/- रुपये दर महिना मिळतील. जेथे कुटुंबाला 50000/- रुपये मिळायचे तेथे 12500/ रुपये यायला लागले तर या व्यक्तीचे घर कसे चालेल?
अथवा किती विमा हवा हे जर गणित मांडायचे असेल तर या पद्धतीनेही मांडता येईल. कुटुंबातल्या व्यक्ती जितकी वर्षे आपल्यावर अवलंबून आहेत तेवढय़ा वर्षांपर्यंत त्यांच्या उदरनिर्वाहासाठी लागणारी रक्कम अधिक भविष्यात मुलांच्या उच्च शिक्षणासाठी व विवाहासाठी लागणाऱया रकमेचा आजचा खर्च अधिक आज असलेल्या कर्जाची रक्कम हे सर्व मिळून जी संख्या येईल, तेवढा तरी विमा कुटुंबप्रमुखाने घ्यायला हवा म्हणजे एक कुटुंब खऱया अर्थाने सुरक्षित होईल व विमा पॉलिसी खऱया अर्थाने कुटुंबाचा तारणहार बनू शकेल. पूर्ण सुरक्षित होण्याचा कुटुंबप्रमुखाचा एक निर्णय निरागस कुटुंबीयांचे हसू सुरक्षित करू शकते. यासाठी टर्म कव्हर व बचतीचा विमा या दोघांचे मिश्रण करून आपल्या कुटुंबाची स्वप्ने आपण पूर्ण करू शकतो. जगलो तर स्वप्नांसाठी निधी संकलन व मृत्यू झाला तर कुटुंबाचे आर्थिक संरक्षण अशाप्रकारे जीवनादरम्यान व जीवनानंतर साथ देणारा कुटुंबाचा तारणहार आपल्यासोबत असायलाच हवा.
- चंद्रहास रहाटे, आर्थिक सल्लागार
























































