
कोविड-19 चे प्रोटोकॉल पाळून अत्यावश्यक घटकांसाठी लोकल प्रवास सुरू असला तरी रेल्वे स्थानकात, फलाटांवर तसेच लोकलमध्ये विना मास्क फिरणाऱ्यांवर लोहमार्ग पोलिसांनी केलेल्या कारवाईत एका दिवसात 19,200 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
लोकल सर्वसामान्यांना अजूनही खुली करण्यात आलेली नाही. अत्यावश्यक सेवा तसेच नॉन पिकअवरमध्ये सर्व महिलांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. अशात आता पालिकेच्या पथकांच्या मदतीने मास्क न घालता फिरणाऱ्यांवर केलेल्या कारवाईत एकाच दिवसात 19,200 रुपयांचा दंड वसुल झाला आहे.
सर्वात जास्त दंड 7,500 कल्याण स्थानकातून जमा करण्यात आला असून 15 प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर सीएसएमटी स्थानकांतून 5 हजार रुपये जमा झाला असून 25 प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर मुंबई सेंट्रल स्थानकातून अकरा प्रवाशांकडून 2200 रुपये दंड जमा करण्यात आला आहे.


























































