हेमंत पाटलांविरुद्ध डॉक्टरांचा एल्गार, आज राज्यभरातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नांदेड येथील शासकीय रुग्णालयात चोवीस तासांत 24 मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर मिंधे गटाचे हिंगोलीतील खासदार हेमंत पाटील यांनी रुग्णालयाच्या अधिष्ठातांना शौचालय साफ करण्यास लावले. त्यावरून राज्यभरातील डॉक्टरांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. डॉक्टरांच्या मार्ड आणि महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटनेने (एमएसएमटीए) खासदार पाटील यांच्याविरोधात यल्गार पुकारला आहे. मुंबईतील सर जे.जे. रुग्णालयासह आज राज्याच्या विविध वैद्यकीय महाविद्यालयांमधील डॉक्टर काळ्या फिती लावून मोर्चा काढून आपला निषेध नोंदवणार आहेत.

नांदेड शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठाता आणि बालरोगशास्त्र विभाग प्रमुख असलेले डॉ. एस.आर. वाकोडे यांना खासदार हेमंत पाटील यांनी जबरदस्ती करत शौचालयाची स्वच्छता करायला लावली. या घटनेची तीव्र निंदा वैद्यकीय क्षेत्रामध्ये होत आहे. या घटनेमुळे महाविद्यालयातील सर्व अध्यापक आणि कर्मचाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण झाले आहे. जे.जे. रुग्णालयात आज मार्ड आणि एमएसएमटीएच्या डॉक्टरांनी बैठक घेऊन या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला. तसेच उद्या रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स काळ्या फिती लावून मूक मोर्चाही काढणार आहेत, अशी माहिती संघटनेचे डॉ. दिनेश धोडी यांनी दिली.

शिवसेनेच्या डॉक्टर्स सेलकडून तीव्र निषेध

कोरोना काळामध्ये राज्यातील डॉक्टरांनी देव बनून लाखो लोकांचे प्राण वाचवले. शासनाच्या नाकर्तेपणाचे खापर त्या डॉक्टरांवर फोडून त्यांना स्वच्छतागृहाची सफाई करायला लावणाऱ्या खासदार हेमंत पाटीलचा आम्ही तीव्र निषेध करतो, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या डॉक्टर्स सेलचे अध्यक्ष डॉ. विवेकानंद जाजू यांनी म्हटले आहे.

अशा लोकप्रतिनिधींचे सदस्यत्व तत्काळ रद्द करा, राजपत्रित अधिकारी महासंघाची मागणी

महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघानेही या घटनेचा निषेध केला असून खासदार हेमंत पाटील यांच्यावर तातडीने कारवाई करा, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. तसेच अशा लोकप्रतिनिधींचे सदस्यत्व तत्काळ रद्द करण्याची तरतूद संबंधित कायद्यामध्ये करण्यात यावी, असेही मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.