
सामना प्रतिनिधी । नांदेड
शासकीय जमिनी वरील भूखंड नाममात्र दरात नियमबाह्य पद्धतीने वाटप केल्या प्रकरणी नायगांव विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे विद्यमान आमदार व तत्कालीन सरपंच वसंतराव चव्हाण यांच्या विरुद्ध अखेर नायगांव पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने दिलेल्या निर्देशानंतर झालेल्या या कारवाईने काँग्रेसच्या राजकीय वर्तूळात खळबळ उडाली असून हे बहुचर्चित भूखंड प्रकरण पुढे कोणते वळण घेते याकडे नांदेड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
गेल्या काही दिवसांपासून नायगांव येथील भूखंड प्रकरण सबंध जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरले आहे. नायगांव येथील जुना गट क्रमांक ४३९ तथा सर्वे क्रमांक १२६ मधील जवळपास २ हेक्टर ४१ आर जमिनीवर शंभर पेक्षा अधिक प्लॉटची लीजडीडच्या नावाखाली नाममात्र दरात नियमबाह्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आल्याची तक्रार नायगांव येथील रघुनाथ सोनकांबळे यांनी केली होती.
भूखंड भाडेतत्वावर वाटप करण्याचा अधिकार स्थानिक ग्रामपंचायतला असला तरीही त्यासाठी जिल्हा परिषदेच्या सीईओ यांची परवानगी किंवा सहमती घेणे आवश्यक असताना सन १९९६ ते २००२ या कालावधीत तत्कालीन सरपंच वसंतराव चव्हाण व इतरांनी ही प्रक्रिया दुर्लक्षित करुन प्लॉट वाटप केल्याने सर्व संबधितावर कारवाई करावी अशी मागणी रघुनाथ सोनकांबळे यांनी प्रशासनाकडे केली होती.
भाडेतत्वावर देखील तीन वर्षापेक्षा जास्त काळ शासकीय जागा देता येत नाही, असा ग्रामपंचायत अधिनियम असतांना संबधितांना सदरील प्लॉटचा ८ चा उतारा देखील देण्यात आल्याची बाब सोनकांबळे यांनी तक्रारीत प्राधान्याने नमुद केली होती.परंतु कार्यवाही बाबत टाळाटाळ झाल्याने तक्रारकर्ते रघुनाथ सोनकांबळे यांनी अखेर औरंगाबाद खंडपीठात यासंदर्भात याचिका दाखल केली होती.
दरम्यान सर्वांची बाजू ऐकल्यानंतर औरंगाबाद खंडपीठाने २९ मार्च रोजी पोलीस प्रशासनाव ताशेरे ओढतांना तत्कालीन सरपंच तथा विद्यमान आमदार वसंत चव्हाण यांच्यासह इतर सर्व संबधितावर कारवाईचे आदेश दिले होते.
त्यामुळे पुढे काय होणार याबाबत अनेकांना उत्सुकता होती. दरम्यान ६ एप्रिल रोजी याचिकाकर्ते रघुनाथ सोनकांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन व उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर आमदार वसंत चव्हाण यांच्या विरुद्ध कलम ४२०, ४६७, ४६८, ४७१, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहीती नायगांवचे पोलीस निरीक्षक आर.एस.पडवळ यांनी दिली.फिर्यादीत प्लॉट घेणाऱ्यांच्या नावाचा देखील उल्लेख असून त्यात अनेक पुढारी व व्यापाऱ्यांचा समावेश आहे.
या बहुचर्चित भूखंड खटल्यात दस्तूरखुद्द आमदार वसंतराव चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला असून ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत घडलेल्या या घडामोडीमुळे सबंध नांदेड जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे. या प्रकरणात आगामी काळात काय काय घडामोडी घडतात हे बघणे औत्सुक्याचे ठरणार असून आमदार वसंतराव चव्हाण यांना याप्रकरणी ९ एप्रिल पर्यंत अंतरीम जामीन मिळाल्याचे कळते.



























































