
सामना प्रतिनिधी, मुंबई
मालाड पश्चिम मालवणी येथील झोपडपट्टीला आज दुपारी लागलेल्या भीषण आगीत 15 झोपडय़ा जळून खाक झाल्या. यामध्ये सुदैवाने कुणीही जखमी झाले नसले तरी लाखोंची वित्तहानी झाली आहे.
मालकणी क्रमांक 1 येथील खारोडी लेक, दौलत शाळेजवळील झोपडपट्टीतील डेकोरेटर्सचे सामान ठेवलेल्या गोदामात दुपारी 2.40 वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. गोदामात डेकोरेशनचे इलेक्ट्रिक आणि लाकडी सामान असल्यामुळे आगीचा भडका उडाला. त्यामुळे काही वेळातच ही आग ‘लेव्हल-2’ची असल्याचे अग्निशमन दलाने जाहीर केले.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी तातडीने दाखल झाले. अग्निशमन दलाने 4 फायर इंजिन व 3 वॉटर टँकर यांच्या सहाय्याने आग विझविण्याचे काम केले. सायंकाळी उशिराने या आगीवर नियंत्रण मिळवून आग विझविण्यात आली. मात्र ही आग का व कशी लागली याबाबत अग्निशमन दल व पोलीस यांच्याकडून तपास सुरू आहे.


























































