लखनौमध्ये कोचिंग सेंटरला आग, 15 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशातील लखनौमध्ये एका तीन मजली इमारतीमधील कोचिंग सेंटरला लागलेल्या भयंकर आगीत 15 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर, सात ते आठ विद्यार्थी जखमी झाले आहेत. जीव वाचवण्यासाठी काही विद्यार्थ्यांनी इमारतीतून उडय़ा मारल्याने त्यांना फ्रॅक्चर झाले आहे. जखमींवर उपचार सुरू आहेत.

लखनौच्या अलिगंज भागात दुपारी तीन वाजता ही घटना घडली. आग लागली तेव्हा सेंटरमध्ये 20 ते 25 विद्यार्थी होते. काही क्षणात आग पसरत गेली. सर्वत्र पसरलेला धूर पाहून प्रचंड घबराट उडाली. लोक बाहेर पडू लागले. मात्र, कोचिंग सेंटरमधील विद्यार्थी आतच अडकले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 14 गाडय़ा घटनास्थळी पोहोचल्या.

मदतकार्यासाठी भिंत तोडली!

धुरामुळे मदतकार्यात अडथळे येत होते. त्यामुळे अग्निशमन जवानांनी बाजूच्या इमारतीची भिंत पाडून आत प्रवेश केला. तिथून स्ट्रेचर आत नेण्यात आले. पाण्याचे पाईप आत टाकण्यात आले. अग्निशमन जवानांनी अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले.

केंद्राकडून 2 लाखांची मदत

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. पंतप्रधानांनी मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाखांची मदत जाहीर केली. तर उत्तर प्रदेश सरकारने 5 लाखांची मदत जाहीर केली आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला.