
मुंबईतील निवासी व अनिवासी उत्तु्ंग इमारतींमध्ये अग्निप्रतिबंधक उपाययोजना करून जानेवारी आणि जुलैमध्ये सहा महिन्यांनी अग्निशमन दलाला ऑनलाइन फायर ऑडिट रिपोर्ट सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. अग्निशमन दलाच्या सरप्राइज व्हिजिटमध्ये ही यंत्रणा नसल्याचे आढळल्यानंतर आठ ते दहा दिवसांत यंत्रणा कार्यान्वित केली नाही तर थेट वीज-पाणी कापण्याची कारवाई करण्यात येईल, असा सज्जड इशारा पालिकेच्या अग्निशमन दलाकडून देण्यात आला आहे.
मुंबईत वर्षभरात घडणाऱया दुर्घटनांमुळे पालिकेच्या अनिशमन दलाला वर्षभरात सुमारे पंधरा हजार ते साडेपंधरा हजार कॉल बचावकार्यासाठी येतात. यामध्ये सुमारे 33 टक्के म्हणजे सुमारे पाच हजार कॉल हे आगीच्या दुर्घटनांचे असतात. गेल्या काही वर्षांपासून मुंबईचा वेगाने होणारा औद्योगिक विकास, नागरीकरण यामुळे दाट वस्ती आणि उंच इमारतींची संख्याही वाढली आहे. या सर्व आस्थापनांमध्ये बहुतांशी ठिकाणी अग्निसुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते. मुंबईत सद्यस्थितीत इमारती, झोपडपट्टी, आस्थापने मिळून सुमारे 40 लाख प्रॉपर्टीज आहेत. अशा सर्व ठिकाणी पालिकेला पोहोचून ऑडिट करणेही शक्य होत नाही. त्यामुळे ‘महाराष्ट्र फायर प्रिव्हेंशन अॅण्ड लाइफ सेफ्टी अॅक्ट मेजर्स अॅक्ट 2006’मधील तरतुदीनुसार दर सहा महिन्यांनी सोसायटय़ांना फायर ऑडिट रिपोर्ट सादर करावा लागेल.
म्हणूनच घेतला निर्णय
पालिकेकडे सध्या 90 मीटर उंचीच्या शिडय़ा आहेत. मात्र शिडय़ांनी केवळ 100 मीटरपर्यंत बचावकार्य करणे शक्य असते. मात्र यापेक्षा जास्त उंचीच्या शिडीवर तोल सांभळण्याच्या दृष्टीने मर्यादा येऊ शकतात. त्यामुळे 45 मीटरवरील इमारींमध्ये प्रिंकलर ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.
शिवाय अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित ठेवणे, यंत्रणा चालवण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ ठेवणे, आग धोक्याची सूचना देणारा फलक लावणे व ही सर्व यंत्रणा असलेले प्रमाणपत्र इमारत, आस्थापनाच्या दर्शनी भागात ठळकपणे लावणे बंधनकारक राहील. हे प्रमाणपत्र प्रमुख अग्निशमन दल अधिकारी यांना www.mahafireservice. gov.in या वेबसाइटवर सादर करावे लागणार आहे.
इलेक्ट्रिकल ऑडिट होण्याची गरज
मुंबईत लागणाऱया आगींमध्ये तब्बल 80 टक्के आगी शॉर्टसर्किटने लागल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सोसायटय़ा, इमारती, आस्थापनांना इलेक्ट्रिक ऑडिट करणे गरजेचे आहे. इमारतींना इलेक्ट्रिक ऑडिटचीही सक्ती करण्याचीही गरज निर्माण झाली आहे. यासाठी पीडब्ल्यूडीसोबत समन्वय साधला जाणार असून इलेक्ट्रिकल सिस्टीमचे ऑडिट केले जाणार असल्याचे समजते.

























































