
पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घेणारा अभिनेता सयाजी शिंदे यांच्या बीड तालुक्यातील पालवनच्या ‘सह्याद्री देवराई’ प्रकल्पाला भीषण आग लागून हजारो दुर्मिळ झाडे जळून खाक झाल्याची घटना घडली. या आगीत काही पशु-पक्षीदेखील होरपळल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सयाजी शिंदे आणि त्याच्या टीमने निर्माण केलेल्या या देवराईला आज सायंकाळच्या सुमारास अचानक आग लागली. डोंगरावर अचानक आगीचे लोळ आणि धूर दिसू लागल्याने ही बाब स्थानिकांच्या लक्षात आली. देवराईतील वाळलेले गवत आणि लाकडांमुळे ही आग आणखीनच भडकत गेली. स्थानिकांनी या आगीची माहिती तातडीने वनविभागाला दिली. वन विभागानेही तातडीने घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र अंधार आणि डोंगरामुळे आग विझवण्यात अडचणी येत आल्या. आग आटोक्यात आणण्यासाठी वन विभागाकडून रात्री उशिरापर्यंत प्रयत्न सुरू होते.




























































