
सामना ऑनलाईन, संभाजीनगर
संभाजीनगरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आग लागली होती. ही आग नगर रचना विभागाच्या कार्यालयात लागली होती असं कळालं आहे. गुरुवारी सकाळी लागलेल्या या आगीमध्ये काही जुनी कागदपत्रे, दस्तऐवज जळून खाक झाल्याची भीती वर्तवण्यात आली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी ती आग अर्ध्या तासात अटोक्यात आणली,मात्र तोपर्यंत अनेक महत्वाची कागदपत्रे जळाली होती.
गुरुवारी सकाळी कार्यालय उघडण्याची गडबड सुरू असतानाच नगर रचना विभागाला आग लागल्याची बातमी आली. ही बातमी कळताच अग्निशमन दलाला तातडीने कळवण्यात आलं. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाने दोन बंब आणि एक टँकर पाठवले होते, ज्यांच्या आधारे अर्धा तासात आग आटोक्यात आणण्यात आली.




























































