बेछूट गोळीबाराने कराड हादरले, तरुणाचा मृत्यू; दोन संशयितांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कराड येथील बुधवार पेठ परिसरातील राहत्या घरात घुसून अज्ञातांनी गोळीबार करून तरुणाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मंगळवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला असून त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. पवन दिपक सोळवंडे असे मृत तरुणाचे नाव असून चार अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर 5 ते 6 गोळ्यांच्या फैरी झाडल्या. यातच त्याचा जागीच मृत्यू झाला.

सोमवार रात्री येथील बांधकाम व्यावसायिक निहाल पठाण याला खंडणी मागून ती न दिल्यामुळे नंग्या तलवारी नाचवून दहशत माजवल्या प्रकरणी मंगळवारी 20 रोजी शहर पोलीस ठाण्यात पवन सोळवंडेसह अन्य चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर मंगळवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडलेल्या गोळीबाराच्या घटनेने शहरात मोठे तणावाचे वातावरण निर्माण झाले. बुधवारी दिवसभर कराड कडकडीत शंभर टक्के बंद ठेवण्यात आले. दरम्यान, या प्रकरणी महेश आबा दुबळे यांनी कराड शहर पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे.

पवन रात्रीच्या सुमारास घरात टीव्ही पाहात असताना लघवीसाठी बाहेर गेला. याच सुमारास टाऊन हॉलच्या बाजूने पांढऱ्या रंगाची इरटीका कार, दोन अॅक्टिवा मोटरसायकल व एक मोटर सायकल अशा वाहनांमधुन दहा ते बारा जण आले. यात जुनेद शेख, समीर मुजावर, मजहर मुजावर, शिवराज इंगवले, हैदर मुल्ला हे ओळखीचे लोक असल्याचे फिर्यादीने सांगितले. यापैकी काहींनी आमच्याकडे पवनच्या घराचा पत्ता विचारला. तो घराकडे जात असतानाच त्यापैकी काहींनी त्याला गाडीत ओढले, त्यावेळी तो पवनला जिवंत सोडणार नाही असे म्हणत असल्याचे फिर्यादीने पोलिसांना सांगितले.

रात्री साडेबाराच्या सुमारास पवन पुन्हा बाहेर आला असता दबा धरून बसलेले समीर मजावर, शिवराज इंगवले, हैदर मुल्ला त्याच्या दिशेने पळत गेले. त्यांनी पिस्तूलमधून पवनवर गोळीबार केला. आम्ही घाबरून रस्त्यावर आल्याचे फिर्यादी महेश आबा दुबळेने (वय 26) पोलिसांनी सांगितले. यानंतर पवनला सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले परंतु ड़ॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले.

दरम्यान, घडलेला प्रकार अतिशय दुर्दैवी आहे. तपास सुरू असून दोन आरोपी ताब्यामध्ये आहे. अजूनही आरोपींचा शोध चालू आहे. आरोपींच्यावर कठोर म्हणजे मोक्याची कारवाई करण्यात येईल, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे यांनी दिली.

तसेच पाच आरोपींची ओळख पटली आहे. उर्वरित पाच आरोपांचा लवकरच शोध घेतला जाईल. सात-आठ वर्षांपूर्वीचे वादातुन दुर्दैवी घटना घडली आहे. भररस्त्यात खून झालेला आहे. भविष्यात अशा प्रकारातुन टोळीयुद्ध होऊ नये, यासाठी विशेष पावले उचलणार आहोत, असे जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्विनी सातपुते यांनी सांगितले.