
सामना प्रतिनिधी । परळी वैजनाथ
बारा ज्योतीर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेले श्री क्षेत्र वैद्यनाथ हे अनेक कारणांनी एकमेवाद्वितीय आहे. त्यामुळे अध्यात्मीकदृष्ट्या यास अनन्यसाधारण महत्व आहे, हिंदुचे सर्वात पुण्यवान क्षेत्र म्हणून काशी तीर्थक्षेत्राला महत्व असले तरी परळी क्षेत्राची ओळख काशीपेक्षाही गव्हूभर अधिक असल्याचे पुराणात सांगीतले आहे. शैव आणि वैष्णव या दोन पंथातील वाद मिटवणारे वारकरी संप्रदायाचे महान संत जगमित्र नागा यांच्या रूपाने भक्तीचे ठिकाण या ठिकाणी आहे.
शिव-शक्ती आणि भक्तीचा त्रिवेणी संगम असल्याने देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक प्रभु वैद्यनाथाच्या दर्शनासाठी लावतात. सोमवारी पहिला श्रावण सोमवारी लाखो भाविकांनी प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतले. हरहर महादेव, प्रभु वैद्यनाथ भगवान की जय, ओम नम: शिवाय आदी जयघोषाने मंदीर परिसर दुमदुमुन गेला होता. पहिल्या श्रावण सोमरनिमित्त देशभरातील भाविक भक्तांनी प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. श्रावण सोमवारच्या पार्श्वभूमीवर वैद्यनाथ देवल कमेटी, पोलीस प्रशासनाच्या वतीने दर्शनासाठी व्यवस्था व कडेकोट सुरक्षा मंदिर परिसरात करण्यात आली होती. वैद्यनाथ देवल कमेटीच्या वतीने महिला व पुरूषासांठी स्वतंत्र्य रांगाची व्यवस्था केलेली होती. याठिकाणी विशेष दर्शन पासेसची व्यवस्था करण्यात आली होती. कुठलाही अनुचीत प्रकार होऊ नये यासाठी मंदीर परिसरात, दर्शनरांगेत व वाहन तळापर्यंत सीसीटिव्ही लावण्यात आले होते. वैद्यनाथ मंदिर परिसर भाविक भक्तांनी फुलून गेला होता.
पंकजा मुंडे यांनी घेतले प्रभु वैद्यनाथाचे दर्शन
श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी आज पंकजा मुंडे यांनी प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतले. दुष्काळाच्या छायेत असलेल्या बीडजिल्ह्यात भरपूर पाऊस पडो आणि माझ्या बळीराजावर कृपा करावी अशी मनोभावे प्रार्थना त्यांनी प्रभू वैद्यनाथाला केली.



























































