फाईलवर पहिली सही माझीच, नंतर मुख्यमंत्र्यांची! अजित पवार यांची फडणवीसांवर कुरघोडी

सरकारमध्ये मी अर्थमंत्री आहे. मात्र माझ्यापेक्षा जास्तीचे अधिकार मुख्यमंत्र्याकडे आहेत, हे मी मान्य करतो. परंतु कोणतीही फाईल मंजूर होत असताना पहिली सही ही अर्थमंत्र्यांचीच असते. माझ्या सहीनंतर ती फाईल मुख्यमंत्र्यांकडे जाते, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कुरघोडी केली.

भोर नगरपालिकेची निवडणूक भाजप आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटामध्ये अत्यंत प्रतिष्ठsची बनली आहे. काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या माजी आमदार संग्राम थोपटे यांनी ही निवडणूक अस्तित्वाची केली आहे. या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहीवरून प्रचारात चांगलीच रंगत आली आहे. दरम्यान, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी निधी मंजुरीवर सही जरी अर्थमंत्र्यांची असली तरी अंतिम सही मुख्यमंत्र्यांची असते, तिजोरीचा मालक आमच्याकडे आहे, असे वक्तव्य केले होते.

आमदार शंकर मांडेकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस असले तरी फाईलवर आधी सही अर्थमंत्री अजित पवार यांची होते. मगच मुख्यमंत्री सही करतात असे सांगून विकास कामांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. आज भोर येथील प्रचार सभेत अजित पवार यांनी देखील फाईलवर पहिली सही आपली होते नंतरच मुख्यमंत्री सही करतात, असे सांगून मांडेकर यांची पाठराखण केली. आता उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भोर नगर परिषदेच्या प्रचारासाठी येत असून ते या सहीच्या प्रचाराला कसे उत्तर देणार हे बघावे लागेल.

काय रे अजित, फार बडबड करत होतास

मी पुण्याचा पालकमंत्री आहे. भोरच्या नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीची सत्ता आणा, त्यानंतरची पुढची जबाबदारी माझी असेल. असे सांगून अजित पवार म्हणाले, जर मी पुढच्या पाच वर्षांत कुठे कमी पडलो तर पुढच्या एखाद्या सभेला आल्यानंतर मला सांगा; काय रे अजित पवार पूर्वी येऊन फार बडबड करत होतास रे, तुझं तर काही लक्षच नाही हे सांगण्याचा तुमचा अधिकार आहे.  

माझ्याकडे जो अधिकार आहे त्या आधारावर विकासाला मदत करणे माझे कर्तव्य आहे. कोणाच्याही खोलीत तिजोरी असूद्या, काय करायचंय? राज्याच्या जनतेची तिजोरी आहे. माझ्या बापाची पण नाही आणि इतरांच्याही बापाची नाही.  – अजित पवार