पतीच्या संपत्तीवर पहिल्या पत्नीचाच हक्क! मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mumbai bombay-highcourt

एखाद्या पुरुषाचे दोन विवाह झाले असतील आणि त्या दोघींनीही संपत्तीसाठी दावा केला तर कायद्यानुसार केवळ पहिल्या पत्नीलाच पतीची मालमत्ता मिळेल मात्र दोन्ही पत्नींपासून झालेल्या मुलांनाही संपत्तीचा अधिकार असल्याचे निरीक्षण आज न्यायमूर्ती शाहरुख काथावाला आणि न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठाने नोंदवले.

रेल्वे पोलीस दलात सहाय्यक उप निरीक्षक पदावर असलेल्या सुरेश हाटणकर यांचा 30 मे रोजी कोविडने मृत्यू झाला. त्यांना शासनातर्फे 65 लाख रुपये भरपाई देण्यात येणार आहे. हाटणकर यांची दोन विवाह झाली असून दोघींनीही भरपाईसाठी दावा केला आहे. त्यासाठी हाटणकर यांच्या दुसऱ्या पत्नी पासून झालेली मुलगी श्रद्धा हिने भरपाईचा अर्धा हिस्सा मिळावा यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. हायकोर्टात आज पार पडलेल्या सुनावणीवेळी सरकारी वकील ऍड. ज्योती चव्हाण यांनी बाजू मांडताना सांगितले की सदर रक्कम हायकोर्टात जमा करण्यात आली असून कोणाला रक्कम द्यायची याबाबत न्यायालयाने निर्णय घ्यावा. त्यावर कोर्टाने म्हटले की, कायद्यानुसार दुसऱ्या पत्नीला संपत्ती मिळणार नाही, असा नियम आहे. परंतु दुसऱ्या पत्नीची मुलगी, आणि पहिल्या पत्नीपासून झालेले अपत्य संपत्तीचे हक्कदार असेल. हाटणकरची पहिली पत्नी शुभदा व त्यांची मुलगी सुरभि या सुनावणीकेळी उपस्थित होत्या त्यावेळी त्यांनी दावा केला की, हाटणकर यांचे दुसरे विवाह झाले असल्याची आपल्याला माहिती नव्हती. त्यावेळी श्रद्धाचे वकील प्रेरक शर्मा यांनी कोर्टाला सांगितले की सुरभि आणि शुभदा यांना हाटणकर यांच्या दोन्ही लग्नांबद्दल माहिती आहे आणि त्यांनी सुरभिशी फेसबुकवर संपर्कही साधला होता.

प्रतिज्ञापत्र सादर करा

खंडपीठाने दोन्ही बाजू कडील युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर हातणकर यांची पहिली पत्नी व तिच्या मुलीला याप्रकरणी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले. व हाटणकर यांची दोन कुटुंबे आहेत हे त्यांना माहित आहे का त्याबाबत गुरुवारपर्यंत माहिती देण्यास सांगितले.