
कडकनाथप्रकरणी महारयत ऍग्रोच्या सहा संचालकांविरोधात एमपीआयडीअंतर्गत पाटण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती तक्रारदार दिग्विजय पाटील यांनी ईश्वरपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. पाटण तालुक्यातील 72 शेतकऱ्यांची तब्बल 1 कोटी 48 लाख 23 हजार 519 रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी मुंबईतील ईडी कार्यालयात अधिकाऱ्यांची भेट घेऊन याप्रकणी चौकशी करण्याची मागणी केली आहे.
सुधीर शंकर मोहिते, संदीप सुभाष मोहिते, गणेश शेवाळे, दमामे मॅडम (पूर्ण नाव नाही), वसीम इबुशेसह राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे पुत्र आणि भाजप युमोचे जिल्हाध्यक्ष सागर खोत अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पाटील म्हणाले, ‘सांगली, सातारा, कोल्हापूरसह मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रासह परराज्यातील हजारो शेतकऱ्यांना या कंपनीने कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे. शेतकऱ्यांना न्यायाच्या भूमिकेतून मदत करावी, अन्यथा आंदोलन केले जाईल. शनिवार, दि. 7 रोजी स्मारक चौक, सोलापूर, 8 रोजी सांगली येथे शेतकऱ्यांचा मेळावा, 9 रोजी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, 11 सप्टेंबर रोजी सातारा येथे शेतकऱ्यांचा मेळावा घेणार आहे. राज्य सरकारने याप्रकरणी तातडीने लक्ष घालून आरोपींवर कारवाई करावी, अन्यथा पश्चिम महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांची सभा होऊ देणार नाही’ असा इशारा कॉ. धनाजी गुरव यांनी यावेळी दिला.






























































