उकाड्यामुळे रेल्वेत तीन प्रवाशांचा मृत्यू नागपुरात उष्माघाताचे पाच बळी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नवतपाच्या तिसरा दिवस सुरू असून विदर्भात उष्णतेची तीव्र लाट पसरली आहे. गेल्या तीन दिवसांपासून तापमानाने उच्चांक गाठले असून आज नागपूरचे तापमान तब्बल 45.7 अंशावर पोहचले होते. या वाढत्या उकाड्यामुळे नागपुरात पाच जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला असून त्यातील तीन प्रवाशांचा धावत्या रेल्वेत मृत्यू झाला.

नागपूर रेल्वे स्थानकात आज दोन अनोळखी व्यक्तींचे मृतदेह आढळून आले. दुपारी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास फलाट क्रमांक 3 वर एका 40 वर्षीय तरुणाचा मृतदेह सापडला. त्यानंतर तासाभराने दुपारी पावणे एक वाजण्याच्या सुमारास फलाट क्रमांक 1 वर एका 70 वर्षीय वृद्धाचा मृतदेह पोलिसांना मिळाला. हे दोघेही भिक्षेकरी असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. त्यानंतर दुपारी अडीच वाजता चर्लापल्ली अमृत भारत एक्सप्रेसच्या जनरल डब्यात 60 वर्षीय महिला मुसरिका रोंनामा, दुपारी सवा तीनच्या सुमारास चेन्नई सेंट्रल-नवी दिल्ली तामिळनाडू एक्सप्रेसच्या जनरल कोचमध्ये मेहरबान केवट (34) व संध्याकाळी साडेसात वाजता अहमदाबाद-हावडा एक्सप्रेसच्या ‘एस/2’ कोचमध्ये आणखी एका प्रवाशाचा मृतदेह सापडला. पाचही मृतांचा उष्माघातामुळे बळी गेल्याचा अंदाज रेल्वे पोलिसांनी वर्तवला असून याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

दुपारी घराबाहेर पडू नका; प्रशासनाचा अलर्ट

देशभरात 25 मेपासून ‘नवतपा’ सुरू झाला असून पहिल्याच दिवशी उत्तर प्रदेशातील बांदा आणि महाराष्ट्रातील ब्रह्मपुरी येथे तापमान 47.6 अंशावर पोहचले होते. या नवतपा काळात विदर्भातील चंद्रपूर येथील ब्रह्मपुरी व वर्ध्यातील तापमानाची सर्वाधिक नोंद झाली. त्यामुळे उष्माघाताचा धोका वाढला असून प्रशासनाकडून सकाळी 11 ते 5 दरम्यान घराबाहेर पडू नका असे आवाहन केले आहे.